एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रस्त्यामध्ये बस बिघडल्यास त्याच तिकिटात करता येणार AC बसमधून प्रवास!

बस बंद पडल्यास आता प्रवाशांना त्याच तिकिटावर पुढील प्रवासासाठी एसीसह कोणतीही उपलब्ध एसटी बस वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

Published on -

संगमनेर – एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नित्यनवीन बदल होत असून, आता प्रवासादरम्यान बस बिघडल्यास प्रवाशांना त्याच तिकिटावर उच्च दर्जाच्या, अगदी एसी बसनेसुद्धा पुढील प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. संगमनेर आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी याबाबत माहिती दिली.

बिघाड झाल्यास थांबा नाही

रस्त्यात एसटी बस बिघडल्यास किंवा ओव्हरहिटिंग, चाक पंक्चर किंवा अपघातासारख्या कारणांमुळे प्रवास थांबला, तरी आता प्रवाशांना वाट पाहावी लागणार नाही. अशा वेळी त्या मार्गावर धावणाऱ्या कोणत्याही इतर बसमधून – मग ती हिरकणी, शिवशाही किंवा एसी व्होल्वो असो – प्रवास सुरू ठेवता येणार आहे.

वेळेची बचत होणार

उन्हाळ्यात गाड्या गरम होणे हे नेहमीचेच. अशा वेळी रस्त्यात अडकलेल्या प्रवाशांना सूर्याच्या कडाक्यात ताटकळावे लागते. मात्र, नवीन निर्णयामुळे त्यांना थेट पुढील उच्च दर्जाच्या बसेसमधून प्रवास करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत तर होईलच, शिवाय मनस्तापही टळेल.

चालक-वाहकांची जबाबदारी झाली कमी

पूर्वी बस बिघडल्यास वाहक आणि चालकांवरच प्रवाशांना पुढे पाठवण्याची जबाबदारी असायची. आता महामंडळाने अधिकृतरित्या यावर व्यवस्था केल्यामुळे त्यांचाही तणाव कमी होणार आहे.

एसटीत आधुनिक सेवांचा समावेश

महामंडळाने साधी सेवा, निमआराम, वातानुकूलित, व्होल्वो एसी, भाडेतत्त्वावर एसी आणि यशवंती (मिडी) यासारख्या सेवा प्रकार प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून दिल्या आहेत. आता या सेवेचा अधिक परिणामकारक उपयोग करता येणार आहे.

प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद

हा बदल फारच स्वागतार्ह असून, काळानुरूप होत असलेला हा सुधारणा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. “ही योजना वेळेवर लागू झाल्यामुळे अनेकांचा त्रास कमी होईल,” असा विश्वास प्रवासी व्यक्त करत आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या या नव्या निर्णयामुळे प्रवास अधिक सुलभ, सुसज्ज आणि वेळेत होणार आहे. तांत्रिक अडचणी आल्या तरीही प्रवाशांचा वेळ वाया जाणार नाही, ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe