Maharashtra News : अनेक वर्षांपासून न मिळालेल्या पीएफच्या पावत्या देण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी काढले आहेत. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यातील ६० हजार शिक्षकांना याचा फायदा होणार असून पीएफमध्ये जमा असलेल्या रकमेचा तपशील मिळणार आहे.
प्रत्येक महिन्याला शिक्षकांच्या खात्यातून पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीची रक्कम वळती केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यावर जिल्ह्याच्या भविष्य निर्वाह निधी व वेतन पथक कार्यालयाकडून शिक्षकांना पीएफच्या स्लिप देणे अपेक्षित असते.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-09-29T115727.801.jpg)
मात्र हजारो शाळांमधील शिक्षकांना दोन, तीन चार ते सहा वर्षांपर्यंत पीएफच्या स्लिप मिळाल्या नसल्याच्या तक्रारी अनेक शिक्षकांनी प्रदेश भाजपचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांनी याबाबत १५ सप्टेंबर रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्याकडे तक्रार करून शिक्षकांना तातडीने पीएफ स्लिप देण्याची मागणी केली होती.
अखेर मंगळवारी शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षक आणि वेतन अधीक्षक तसेच ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी व वेतन अधीक्षक यांना आदेश देऊन शिक्षकांना तातडीने पीएफ स्लिप देण्याचे निर्देश दिले आहेत. खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही स्लिप मिळणार आहे.
पीएफ स्लिपचा फायदा काय?
आपल्या प्रॉव्हिडंट फंडात किती रक्कम आहे याचा तपशील मिळतो. पीएफमधून आपल्याला घर दुरुस्ती, गृह कर्ज परतफेड, वैद्यकीय तसेच पाल्याच्या उच्च शिक्षणासाठी व लग्नासाठी ना परतावा रक्कम काढता येते.