Maharashtra School | राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक यांसारख्या पदे 100% नामनिर्देशन तसेच अनुकंपा नियुक्तीच्या माध्यमातून भरण्यास मान्यता दिली आहे. यामुळे 21 वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होणार आहे.
रखडलेली भरती पुन्हा सुरू-
राज्य शासनाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार, विद्यमान आकृतिबंध सुधारून नव्याने मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार, विद्यार्थी संख्येच्या आधारावर कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक या पदांना मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करण्यात आली असून त्यांच्या जागी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. मात्र, सध्या कार्यरत असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत आपली सेवा सुरू ठेवू शकतील.

शिक्षक पदभरतीप्रमाणेच शिक्षकेतर पदभरतीतही एकूण रिक्त जागांपैकी 80% पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी शालेय शिक्षण विभागाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये प्रत्येक विभागीय आयुक्तांनी अनुशेष नोंदवहीची तपासणी करून त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
5000 उमेदवारांना दिलासा
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सध्या शिक्षकांकडे असलेली अतिरिक्त जबाबदारी कमी होणार आहे. लेखी पत्र व्यवहार, ग्रंथालय व प्रयोगशाळा व्यवस्थापन यांसारखी कामे यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडे वर्ग होणार आहेत. परिणामी, शिक्षकांना शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार असून शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे राज्यभरात जवळपास 5,000 रिक्त शिक्षकेतर पदांच्या भरतीला संधी मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे. शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनीही या निर्णयाचे स्वागत करत शासनाचे आभार मानले आहेत.













