१३ जानेवारी २०२५ ठाणे : राज्यात सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधण्याचा आमच्या सरकारचा संकल्प आहे,असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ‘ऑटोफेस्ट-२०२५’ या ऑटो कार फेस्टिव्हलचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.त्या वेळी ते बोलत होते.परदेशातील वाहनांच्या पूर्णनिर्मितीचे काम आपल्या येथे सुरू होईल.
यामुळे येथील नागरिकांना नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध होईल,असे सांगत शिंदे म्हणाले,ठाणे खऱ्या अर्थाने बदलत आहे.तसेच मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.आमच्या सरकारने विकासात्मक काम केले आहे.विकास हाच आमच्या सरकारचा आजवरचा संकल्प राहिल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन्ही खात्यांचा मीच मंत्री आहे.यामुळे घरांसंबंधी कायदा करणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्याकडेच आहे.सर्वसामान्य नागरिक,काम करणाऱ्या महिला,शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे.त्यासाठी संपूर्ण राज्यात परवडणारी घरे उभारणे,परवडणारी भाडे तत्त्वावरील घरे उभारणे,असा सरकारचा संकल्प आहे,असे शिंदे यांनी सांगितले.
सर्व काही पैशांनी विकत घेता येते.पण, विश्वास आणि इमानदारी पैशांनी विकत घेता येत नाही.हेच काम रेमंड समूहाने केले आहे,अशी प्रशंसा त्यांनी केली.या समूहाने शासनाच्या शाळा दत्तक घेऊन शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे,अशी सूचनाही शिंदे यांनी उद्योगपती गौतम सिंघानिया यांना केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पोर्ट्स बाईक आणि रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला.तसेच उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्या बरोबर बसून स्पोर्ट्स कार चालवण्याचा थरारही अनुभवला.या वेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हेही उपस्थित होते.