सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे – संभाजीराजे छत्रपती

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : आरक्षणासाठी आतापर्यंत मराठा समाजातील ४९ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीदेखील सरकारकडून प्रश्न सुटलेला नाही. मनोज जरांगे यांनी त्यांची प्रकृती सांभाळून आणि सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल, याबाबत चर्चा करावी.

भावना आणि न्यायिक मुद्दा या दोन्ही गोष्टींचा समेट कसा करता येईल, हे महत्त्वाचे असून सरकारने देखील टिकणारे आरक्षण द्यावे, असे मत स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकमध्ये व्यक्त केले.

स्वराज्य संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे नाशिकमध्ये उद्घाटन झाले. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू असून, मागील काही दिवसांत हे उपोषण चर्चेत आले आहे. या उपोषणस्थळी अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिल्या आहेत. मीदेखील उपोषणस्थळी जाऊन आलो आहे.

सरकारच्या दोन-तीन शिष्टमंडळांनी भेटी देऊनही अद्याप मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्दयावर समाजाच्या भावना तीव्र आहेत. आरक्षणाबाबत मी माझी भूमिका मांडली आहे.

समाजाच्या भावना आणि न्यायिक प्रकरण या दोन्हींचा समेट कसा करता येईल, याबाबत शासनाने विचार करावा. मनोज जरांगे यांनी तब्येत सांभाळावी, त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलून पुढे कसे जाता येईल, याबाबत शासनाने चर्चा करावी. माझ्या दृष्टिकोनातून प्रश्न सोडवत असताना जीवदेखील महत्त्वाचा असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्या-जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन अन् बॅनरबाजी सुरू आहे. त्यावर अनेक नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जात आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या संभाजीराजे यांचा एका बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

याबाबत संभाजीराजे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, बॅनरवर भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याबद्दल मी आभारी आहे. बॅनरवर लिहिणे आणि प्रत्यक्षात होणे या वेगळ्या गोष्टी असतात, असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe