मराठा आरक्षणासह अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत, तर महाराष्ट्रातील आंदोलकांवरील गुन्हे महिनाभरात मागे घ्यावे, सरकारने मराठ्यांशी दगाफटका करू नये; अन्यथा सरकारला ते जड जाईल, असा गर्भीत इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे.
येत्या २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणारच आहे; अन्यथा दोन कोटी मराठे मुंबईदर्शनासाठी मुंबईत येतील. तथापि, आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यातील मराठा समाजबांधवांची एक महत्त्वाची बैठक १७ डिसेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे घेतली जाणार आहे, त्यात पुढील निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी जालन्यातील जरांगे-पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना जरांगे-पाटलांनी आपले इरादे स्पष्ट केले.
ते म्हणाले की, पोलिसांनी आमच्या मायमावल्यांवर लाठ्याकाठ्या घातल्या, आमच्या भावांवर गोळ्या घातल्या आणि उलट आमच्या लेकरांवरच गुन्हे दाखल केले. सरकारचे शिष्टमंडळ अंतरवालीत आले होते, त्याचवेळी मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जाईल, असे जाहीर सांगण्यात आले होते; परंतु गुन्हे मागे तर घेतले नाही,
उलट अटकसत्र सुरू केले, हा काय दगाफटका आहे, आमच्या कार्यकर्त्याला एमसीआर असताना त्याला पुन्हा पीसीआर कशाला? सरकारने आमचा गेम तर नाही केला? असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
आम्हाला कितीही डिवचले तरी आम्ही शांततेचा मार्ग सोडणार नाही, आमचे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट करून जरांगे-पाटलांनी मराठा तरुणांनादेखील हिंसेचा मार्ग पत्करू नका, जाळपोळ, दगडफेक करू नका, आपल्याला शांततेतच सरकारला जेरीस आणायचे आहे, असे ते म्हणाले.
जरांगे पाटलांचा भुजबळांवर निशाना
भाषणाच्या सुरुवातीलाच जरांगे-पाटलांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाना साधला. कायद्याच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने जाती-जातीत तेढ निर्माण करून पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, अशी टिका करून ते म्हणाले की, भुजबळांनी ओबीसी आरक्षणातील जातींवरसुद्धा अन्याय केला असून महामंडळाचा ८० टक्के हिस्सा खावून २० टक्केच समाजाला लाभ दिल्याचा आरोप केला. मुळात ओबीसी किंवा धनगर समाजाविषयी या तथाकथित ओबीसी नेत्याला कसलीही आस्था नाही, केवळ गर्दी जमवण्यासाठी त्यांचा वापर करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
लातूरची सभा होणारच
लातूर येथे सभा होणार असल्याने तेथील कलेक्टरांनी कलम १४४ लागू केले. हा प्रकार म्हणजे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून बीड, लातूर जिल्ह्यात नोंदी शोधण्याऐवजी प्रशासनाकडून असले काम केले जाते का? असे स्पष्ट करून जरांगे-पाटलांनी सरकारने मराठा समाजाचा रोष पत्करू नये, सभा तर होणारच आहे. मराठे तसेही शांत आहेत; परंतु आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, आमचे आंदोलन उग्र नाही, मात्र साखळी उपोषण करू, असा इशारा दिला.