बीडमध्ये हेडमास्तर अजितदादांची तंबी : चारित्र्य सांभाळा, नीट राहा, खंडणीखोरांना थेट मकोका

Published on -

३१ जानेवारी २०२५ बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री म्हणून प्रथमच बीड शहरात दाखल झाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत रोखठोक भूमिका मांडली.बीड जिल्ह्यात जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल, गुन्हेगारी करणार असेल किंवा कोणी विकासकामांच्या आड येत असेल तर मी ते खपवून घेणार नाही.

वेळ पडल्यास अशा लोकांवर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही.जिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल.अशा शब्दांत अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. जिल्ह्यातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित संवादादरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते, याठिकाणी चांगले अधिकारी पाहिजेत.

काही अधिकारी बरीच वर्षे याठिकाणी आहेत. मी त्यामध्ये दुरुस्ती करणार आहे. काम करताना मी भेदभाव करत नाही, मी काम करताना जातीपाती नात्या-गोत्याचा विचार केलेला नाही. जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे. बीड जिल्ह्यात कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याची प्रतिमा बदलण्यासाठी आपण काम करू. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिले जाणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.

चुकीचे वागू नका

काहीजण मला भलामोठा हार, बुके किंवा पांडुरंगाची मूर्ती देतात, पण या लोकांनी साधुसंतांचे विचारही लक्षात घेतले पाहिजेत. ‘दादा आला तर आता काही काळजी नाही’, असा विचार करत असाल तर तो मनातून काढून टाका. मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचे वागू नका, चुकीचे मी खपवून घेणार नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

मला बदल जाणवला पाहिजे !

मी बीडमधील काही लोकांचे रिव्हॉल्व्हर हवेत उंचावून, कंबरेला लावून फिरतानाचे रील सोशल मीडियावर पाहिले आहेत.पुन्हा अशा गोष्टी दिसल्या तर खपवून घेतल्या जाणार नाहीत,संबंधितांचे लायसन्स रद्द केले जातील.मी सगळ्यांना सारखा नियम लावणार. बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे, तो मला आणि नागरिकांना जाणवला पाहिजे, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!