कुकाणे-सौंदाळे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत शिव्या बंदी आणि विधवा महिलांच्या सन्मानासाठी ठराव मंजूर केला आहे. मात्र, या निर्णयाला शासनाची अधिकृत मान्यता मिळावी आणि संपूर्ण राज्यात अमलात यावा, यासाठी सौंदाळे ग्रामपंचायतीचे सरपंच शरदराव आरगडे यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपोषण सुरू केले आहे. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात त्यांनी हे बेमुदत उपोषण सुरू केले.
शिव्या बंदी
ग्रामपंचायतीने स्त्री सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत शिव्या बंदीचा ठराव मंजूर केला आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अपमानास्पद भाषेचा वापर होऊ नये यासाठी, शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

शिव्या बंदी आवश्यक का?
शिव्या देताना त्या केवळ भांडणाचा भाग असतात, पण स्त्रियांचा कुठलाही संबंध नसताना त्यांचा उल्लेख शिव्यांमध्ये केला जातो. ही अविचारी आणि अपमानास्पद भाषा केवळ महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत नाही, तर समाजात स्त्रियांबद्दलच्या दृष्टीकोनावरही विपरीत परिणाम करते. या कारणांमुळे सौंदाळे ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून, स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी शिव्या बंदीचा निर्णय घेतला आहे.
विधवा महिलांचा सन्मान
विधवा महिलांच्या बाबतीत समाजामध्ये आजही अनेक जुने आणि अन्यायकारक नियम प्रचलित आहेत. पतीच्या निधनानंतर महिलांचे कुंकू पुसले जाते, जोडवे काढली जातात, तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी होण्यास अडथळा आणला जातो.
स्त्रीच्या हक्कांची जाणीव
ग्रामसभेने या अन्यायकारक परंपरांना आव्हान देत विधवा महिलांना पुन्हा सन्मानाने जगता यावे यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विधवा महिलांना कुंकू-टिकली आणि मंगळसूत्र परिधान करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्विवाहाला संपूर्ण समाजाने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना आपल्या कुटुंबासाठी सक्षम होण्यासाठी समान हक्क आणि संधी द्याव्यात.
सौंदाळे ग्रामपंचायतीने या सुधारित निर्णयांना राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी सरकारने अधिकृत कायदा करावा, अशी मागणी केली आहे. “महाराष्ट्र शासनाने विधवा महिलांसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी शिव्या बंदी व विधवा सन्मान कायदा आणावा,” असे मत सरपंच आरगडे यांनी व्यक्त केले.
सरपंच शरदराव आरगडे यांनी सौंदाळा येथील सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे.