२५ जानेवारी २०२५ पुणे : विमाननगर परिसरात धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेला धमकावून तिला एका घरात डांबून ठेवण्यात आले.या महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत एका ३२ वर्षीय पीडित महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संतोष रामदास गायकवाड (५५, रा. विठ्ठल मंदिरासमोर, धानोरी), सागर मधुकर लांडगे (३०, रा. गल्ली क्रमांक ३, माधवनगर, धानोरी) तसेच एका महिलेला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी आरोपींविरुद्ध अत्याचार, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी आणि पीडित महिला ओळखीचे आहेत.आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली.तिला धानोरी परिसरात बोलावले.आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरात संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी तिला डांबून ठेवले.
यानंतर दोघांनीही पीडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.आरोपींनी महिलेवर अत्याचार केला.तसेच या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करून समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली.त्यानंतर आरोपी सागर लांडगे याने पीडित महिलेला लोहगाव परिसरात नेले.
तेथे तिला एका खोलीत डांबून ठेवले.त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी अत्याचार केले,असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करत आहेत.