SPG Security Chief | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडे (SPG) असते. ही सुरक्षा यंत्रणा देशातील सर्वात अत्याधुनिक आणि प्रशिक्षित कमांडोंनी सुसज्ज आहे. देशाचे पंतप्रधान, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर SPG कमांडो कायम त्यांच्या सोबत असतात. त्यामुळेच अनेकांना उत्सुकता असते की, इतकी जबाबदारी असणाऱ्या SPG कमांडोंना आणि त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना सरकारकडून किती वेतन दिलं जातं?
मिळालेल्या माहितीनुसार, SPG मध्ये काम करणाऱ्या कमांडोंचं वेतन त्यांच्या पद, अनुभव आणि रँकनुसार ठरवले जातं. SPG कमांडरचे मासिक वेतन सुमारे 84,236 रुपये ते 2,39,457 रुपयांदरम्यान असू शकते. विशेष म्हणजे, ही रक्कम त्यांच्या कामाच्या स्वरूपावर आणि सेवा वर्षांवर अवलंबून असते.

भत्तेही मिळतात?
11 ते 20 वर्षांच्या अनुभवानुसार SPG सुरक्षा अधिकाऱ्यांचा वार्षिक पगार जवळपास 8 लाख ते 18 लाख रुपयांदरम्यान असतो. याशिवाय, सरकारकडून अनेक भत्तेही देण्यात येतात. यामध्ये जोखीम भत्ता, ड्रेस अलाऊन्स आणि इतर सवलतींचा समावेश होतो. ऑपरेशनल ड्युटीवर असणाऱ्यांना 27,800 रुपये भत्ता दिला जातो, तर नॉन ऑपरेशनल ड्युटीवर असणाऱ्यांना 21,225 रुपये मिळतात.
SPG इंचार्जच्या वेतनाची रक्कम मात्र अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. हे पद अत्यंत संवेदनशील असून त्यातील माहिती गोपनीय ठेवली जाते. मात्र SPG कमांडोंच्या वेतनावरून अंदाज लावता येतो की, इंचार्जला यापेक्षा अधिक वेतन दिले जात असावे.
SPG मध्ये भरती होण्यासाठी अत्यंत कठोर निकष पाळावे लागतात. उमेदवारांची शारीरिक आणि मानसिक क्षमता, शिस्त, प्रशिक्षण, तसेच राष्ट्रनिष्ठा यांची कसून परीक्षा घेतली जाते. त्यामुळे या यंत्रणेत काम करणे ही केवळ नोकरी नसून ती एक मोठी जबाबदारी आणि गौरवाची गोष्ट मानली जाते.