१० मार्च २०२५ पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. राज्य परिवहन विभागाकडून २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याचा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागातील विभागातील ६७५ तर, पीएमपीएमल विभागातील ५५० बसेसना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यात येणार आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाकडून खासगी वाहनांसह सार्वजनिक वाहतूक करणारे एसटी, पीएमपी बस यासह सरकारी विभागातील गाड्यांचे नंबर बसविण्यास सुरुवात झाली आहे. पुणे एसटी विभागात १४ आगार आहेत. त्यामध्ये जवळपास ८०० पेक्षा अधिक एसटी बस आहेत. त्यातील ६५० एसटी बस या २०१९ पूर्वीच्या आहेत. तर दहा ते पंधरा वाहने (चारचाकी) ही खात्याची आहेत.

त्यानुसार एसटी विभागाकडून सर्व बसचे नंबर, रजिस्ट्रेशन आणि चासी नंबर, वर्षे याची यादी अंतीम करण्यात आली आहे. टप्प्यटप्याने एचएसआरपी नंबर बसविण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी पुणे विभागीय प्रशासनाने दिली.तर पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमल) विभागात साडेपाचशे बस या २०१९ पूर्वीच्या आहेत. तर खात्यातील वाहने (चारचाकी) चार ते पाच आहेत.
पुणे आरटीओकडून नेमण्यात आलेल्या एजन्सीशी संपर्क साधून बसची सर्व माहिती त्यांना देण्यात येणार आहे. त्यानुसार रजिस्ट्रेशन करून एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती पीएमपीचे चीप ट्रान्सस्पोर्ट मॅनेजर दत्तात्रय झेंडे यांनी दिली.