Mumbai News : मराठी पाटी नसल्यास एक लाखापर्यंत दंड !

Mumbai News : सर्वोच्च न्यायालयाने दुकाने-आस्थापनांवरील पाट्या मराठी करण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने मुंबई महापालिकेने मंगळवारपासून दुकाने-आस्थापनांची झाडाझडती सुरू केली आहे.

पहिल्याच दिवशी ३२६९ ठिकाणी केलेल्या तपासणीत १७६ ठिकाणी मराठी पाटी लावण्यास दुर्लक्ष करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. येत्या काळात ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे.

प्रति कामगार दोन हजार याप्रमाणे जास्तीत जास्त एक लाखापर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

दुकाने-आस्थापनांवर मराठीत पाट्या लावण्यासाठी न्यायालयाने दोन महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली. त्यामुळे पालिकेच्या दुकाने आस्थापने विभागाकडून मंगळवारपासून सर्व २४ वॉडांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या पथकाकडून कारवाई सुरू करण्यात आली.

पालिकेने पहिल्याच दिवशी ३२६९ ठिकाणी दुकानांची तपासणी केली. या तपासणीत १७६ दुकानांवर मराठीत पाट्या लावल्या नसल्याचे आढळले. न्यायालयाच्या निर्देशानुसार, पालिकेने संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली. आगामी काळात ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मार्च २०२२ ला दुकाने आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी २०१८ च्या निर्णयानुसार, दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होते.

मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईत सुमारे सात लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.