इलेक्ट्रिक बाईक आणि स्कुटर वापरात असाल तर ही बातमी वाचाच

Maharashtra News : दुचाकीस्वारांसाठीचे अनिवार्य विमा, हेल्मेटसक्ती आणि दंडात्मक कारवाईचे विद्यमान नियम इलेक्ट्रिक वाहनांसाठी (इलेक्ट्रिक बाईक आणि स्कुटर) देखील लागू असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले.

ई-वाहनांच्या बॅटरीसाठीचे मापदंड केंद्र सरकारने यापूर्वीच निश्चित केलेले असल्याने आमच्याकडून कोणत्याही निर्देशांची गरज नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

मोटर वाहन कायद्यानुसार दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे, विमा उतरवणे अनिवार्य आहे. हे नियम इलेक्ट्रिक दुचाकी वापरणाऱ्यांसाठी देखील लागू करण्याचे निर्देश देण्याची मागणी एका जनहित याचिकेद्वारे करण्यात आली होती

मात्र मोटर वाहन कायदा ई-वाहनांसाठी देखील लागू असल्याचे स्पष्ट करत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली.

ही जनहित याचिका पूर्णपणे बातम्यांच्या आधारावर दाखल करण्यात आली आहे. याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आलेले मुद्दे, आरोपांमध्ये देखील काही तथ्य नाही. अशा याचिका न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवतात, असे खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारले.