‘मातोश्री’वर होणाऱ्या बैठकींमध्ये वाढ ! काय असेल उद्धव ठाकरेंचा पुढचा प्लॅन ?

Published on -

१८ फेब्रुवारी २०२५ मुंबई : शिवसेनेला (ठाकरे) लागलेली गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून त्यांनी पक्षाच्या खासदारांची २०, तर आमदारांची २५ फेब्रुवारीला बैठक बोलावली आहे.पक्षातील कमकुवत बाबींवर आणि विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गटनेते पदाबाबत तेव्हा चर्चा केली जाणार असल्याचे समजते.

शिवसैनिक पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने ठाकरे यांचे टेंशन वाढले आहे.खासदार देखील सेनेची साथ सोडणार,अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकतेच लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेला (ठाकरे) जय महाराष्ट्र करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.साळवी यांच्या पाठोपाठ माजी आमदार सुभाष बने यांच्यासह अनेक नेत्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात ठाकरेंना मोठा हादरा बसला.शिवसेनेची रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील माजी नगरसेविका राजूल पटेल यांनीही पक्षत्याग केला.शिवसेनेला (ठाकरे) खालसा करण्यासाठी शिंदे यांच्या पुढाकाराने ‘मिशन टायगर’ राबवले जात आहे.माजी आमदार वैभव नाईकही लवकरच प्रवेश करतील,असा दावा शिंदेंच्या सेनेकडून केला जात आहे.

कोकणातील शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांना देखील गळाला लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.आजवर निष्ठावंत राहिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून पक्ष सोडण्याचे प्रकार वाढीस लागल्याने ठाकरे यांनी खासदार, आमदारांची बैठक बोलावली आहे.

पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आणि पक्षात नेमके काय सुरू आहे, खासदार आमदारांच्या मनात नेमके काय आहे, हे जाणून घेण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जाते.’मातोश्री’वर हल्ली रोज बैठका होतात. प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातो. ठाकरे त्यावेळी उपस्थित असतात, असे शिवसेनेचे (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी सांगितले.

आंगणेवाडी यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी भेट

पक्ष सोडणार असल्याची चर्चा असलेल्या माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. भेटीबाबत विचारले असता ‘आंगणेवाडी यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी पक्षप्रमुखांची भेट घेतली. शिवसेना सोडण्याचा कोणताही विचार नाही.पराभव झाला असला, तरी थोडे थांबू आणि पुन्हा लढून नव्याने साम्राज्य निर्माण करू,’ अशी प्रतिक्रिया नाईक यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe