इंदोरीकर महाराज पुन्हा गैरहजर ! आता २४ नोव्हेंबरला यावेच लागणार…

Updated on -

Maharashtra News : अपत्य प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले निवृत्ती महाराज देशमुख हे काल मंगळवारी येथील न्यायालयात पुन्हा गैरहजर होते. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी होणार असून या तारखेला महाराजांना हजर राहण्याची सक्ती करण्यात आली आहे.

आपत्य प्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केल्याने इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात २०२० साली पी.सी.पी.एन.डी.टी. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी महाराजांच्या विरोधात संगमनेर येथील न्यायालयात तक्रार केली होती.

ही केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही केस पुन्हा संगमनेर न्यायालयात पाठवली. संगमनेर न्यायालयाने दि. १३ सप्टेंबर रोजी ही केस पुन्हा फैलावर घेतली.

ऑक्टोबर महिन्यात महाराजांना समन्स पाठवून न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते; मात्र ते न्यायालयात हजर राहिले नाही. न्यायालयात हजर होण्यासाठी त्यांना पुन्हा तारीख देण्यात आली होती;

मात्र ते न्यायालयात त्यावेळी हजर राहिले नव्हते. या खटल्याची पुढील सुनावणी काल मंगळवारी होणार होती. कालही ते गैरहजर राहिले. काल न्यायालयामध्ये दोन अर्जावर सुनावणी झाली.

महाराजांविरुद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता.

याबाबत गवांदे यांनी जोरदार युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर निवृत्ती महाराज देशमुख यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी २४ नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News