Maharashtra News : भावी पिढी सुधारायची असेल तर मुला-मुलीकडील मोबाईल बंद करा. विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास पाठवण्याची पद्धत चुकीची आहे. शाळेच्या वेळात शिक्षकांनाही मोबाईलला प्रतिबंध ठेवा,
असा सल्ला समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज देशमुख यांनी दिला आहे.तालुक्यातील टिळकनगर येथील जागृत देवस्थान श्री म्हसोबा महाराज यात्रेप्रसंगी आयोजित कीर्तनात काल सोमवारी (दि.१) ते बोलत होते. यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले की,
पैसा, सत्ता, संपत्ती आपल्या कामी येत नाही. त्यामुळे पैशाची ताकद आणि सत्तेचा योग्य वापर करा. चांगले वागणे कधीच वाया जात नाही. झाडांना पाणी द्या, शक्य तेवढ्या लोकांना मदत करा, असा सल्ला इंदोरीकर महाराज यांनी उपस्थित भाविकांना दिला.
माणसाने आधी स्वः शरीराची काळजी घ्यावी, हृदयविकार म्हणजे मानसिक ताणतणाव आणि तो न येण्यासाठी नितीनियम, निसर्गनियमाचे पालन करावे. तारुण्यात मरण हे नशिबाने नसते तर नशेने, निराशेने, ओव्हरस्पिडने अथवा अलिकडे मोबाईलच्या नादातही येते.
विवाह सोहळ्यात फटाके न उडवता शाळेसाठी मदत करावी. भांडण, तंटे करून पोलीस ठाणे, कोर्टाची पायरी चढू नये. अनावश्यक खर्च टाळून शालेय कामाकरिता मदत करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दोन दिवसीय म्हसोबा महाराज यात्रेची सांगता इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाने काल सोमवारी झाली. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.