राष्ट्रीय महामार्ग आहे कि तलाव ? मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास खड्ड्यांतूनच करावा लागणार

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : एक दोन नव्हे तर तब्बल १३ वर्षे उलटूनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला नाही. पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी. च्या पावसाळ्यात जागोजागी पडणारे खट्टे ही नेहमीचीच बाब आहे. यंदाही या महाभागांवर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे, तर वडखळपासून नागोठणे ते कोलाडदरम्यान या खड्ड्यांमुळे रस्ता नाहीसा झाल्याचे चित्र आहे.

या रस्त्याची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्याने यंदाच्या पावसाळ्यातही प्रवाशांना व वाहन चालकांना या महामार्गावरील खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे. या महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी आल्याने या राष्ट्रीय महामार्गाला तलावाचे स्वरूप आले आहे.

वखळ ते कोलाडदरम्यान गडब, आमटेम, कोलेटी, पळस, नागोठणे, वाकण, ऐनघर, सुकेळी खिंड, खांब, वरसगाव पुढे इंदापूरपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या चार ते सहा फूट रुंदीचे व एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पाण्याने भरल्याने या महामार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तीन दिवसांपूर्वीच नागोठणेजवळील वाकण नाका वाहतूक पोलीस चौकीजवळील खड्ड्यातून वाट काढताना लोखंडी कॉईलची वाहतूक करणारा ट्रेलर रस्त्यातच उलटला होता. तर गुरुवार, २७ जुलै रोजी रात्री उशिरा नागोठणे जवळील कोलेटीनजीक कंटेनर वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली. सुदैवाने मात्र या दोन्ही अपघातात कोणतीही जीवितहानी या वेळी झाली नसली तरी, आजवर या महामार्गावर झालेल्या अपघातात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. तरीही संबंधित विभागातील मंत्री तसेच कोकणातील लोकप्रतिनिधी यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचे कोकणवासीयांचे म्हणणे आहे.

९ ऑगस्टला आंदोलन

गेली १३ वर्षे या महामार्गावि काम रखडले आहे. या पार्श्वभूमीवर जर ३१ जुलै २०२३ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ ते कोलाडदरम्यान पडलेले सर्व खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्यात आला नाही, तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली ९ ऑगस्ट रोजी वाकण नाका येथे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना येथील पाहणी दौऱ्यादरम्यान निवेदनाद्वारे दिला आहे.

मंत्र्यांचे आश्वासन हवेत विरले

पनवेल पळस्पे ते इंदापूर या ८४ किमीच्या टप्प्यात कोकणाकडे जाणाऱ्या मार्गिकेतील कासू ते इंदापूरदरम्यान नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गणेशोत्सवाआधी सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी या महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिली होती. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांचे आश्वासनही आता हवेत विरल्याचे दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe