मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली, हे शिंदे फडणवीस सरकारचे अपयश

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची वेळ आली, हे शिंदे फडणवीस सरकारचे अपयश आहे. शब्द दिल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वास्तविक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी त्यावेळच्या आघाडी सरकारने मराठा समाजाला दहा टक्के तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलेले होते.

सत्तांतरानंतर २०१४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुस्लिम समाजाचे आरक्षण स्थगित ठेवून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यायचे म्हणून विधेयक आणले. आणि सर्वच पक्षाचे आमदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला.

सदरच्या आरक्षणाला न्यायालयात चॅलेंज केले गेले. तथापि उच्च न्यायालयानेही त्यास मान्यता दिली. परंतु अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि मेरिट अँड मेरिट सेव्ह नेशन अशा काही संस्थांनी सुप्रीम कोर्टात मोठ-मोठ्या वकिलांची फौज उभी करून सदरचे आरक्षण हाणून पाडले असे समजते. या सर्वांच्या पाठीमागील बोलाविते धनी कोण आहेत, याची माहिती समाजातील सर्वच शिक्षित आणि इंटरनेट फ्रेंडली युवकांना माहित आहे.

या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. आंदोलकानी संयम, शांतता, नियोजन आणि सुसंस्कृतपणाचा आदर्श जगासमोर ठेवला. मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाला शिंदे फडणवीस सरकारच्या पोलिसांनी गालबोट लावले.

निरपराध आणि निष्पाप आंदोलकांवर लाठीकाठी चालवली, अश्रुधूर सोडला. हे कमी म्हणून की काय बंदुकीमधून रबरी छरेही उडवण्यात आल्याची वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये नोंद आहे. या अमानुषतेमुळे आंदोलन चिघळले आणि मुख्यमंत्र्यांना आंदोलनस्थळी येऊन महिन्याभरामध्ये प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन द्यावे लागले.

राज्याच्या प्रमुखांनीच दस्तूरखुद्द उपस्थित राहून आश्वासन दिल्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आता निश्चितच सुटेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु मुदत संपून वर दहा दिवस झाले असतानाही आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला असल्याने जरांगे पाटलांसह सर्वच बांधव निराश झाले आहेत.

मराठवाड्यातील आजपर्यंत सहा मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. हे अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. शब्द दिल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे.

येणाऱ्या नागपूर अधिवेशनात आश्वासन पाळले न गेल्याने वैफल्यग्रस्त मराठा बांधवांनी केलेल्या आत्महत्याबाबत आम्ही या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. तरीही मराठा बांधवांनी अधिक आत्मकलेश करून न घेता नेहमीच्या लौकिकाप्रमाणे शांततामय मार्गानेच आंदोलन करावे, अशी प्रार्थना आपण करीत आहे.

शिंदे फडणवीस सरकारने सामाजिक स्वास्थ्य बिघडणारे जे अनेक प्रश्न निर्माण केले. त्याबाबत विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार मुंबई येथे एकत्र येणार आहेत. तसेच राज्यपाल महोदयांही भेटणार असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe