Maharashtra News : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना अत्यंत उपयुक्त आहे. महायुती शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या जलयुक्त शिवार अभियान २ अंतर्गत कोपरगाव मतदार संघाचा ८.३४ कोटीचा जलयुक्त शिवार आराखडा शासन दरबारी सादर केल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पडणारा पाऊस आणि त्या पावसाच्या पाण्याचे सुनियोजन करणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाचा राज्यासह मराठवाड्याला मोठा फायदा झाला असून देशात
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/10/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-2023-10-05T152535.818.jpg)
राज्याने जलयुक्त शिवार अभियानात अव्वल कामगिरी बजावली आहे. त्यामुळे महायुती शासनाने जलयुक्त शिवार अभियान २ सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून जलयुक्त शिवार – २ अभियानाला मान्यता दिली आहे.
या अभियाना अंतर्गत राज्यातील जवळपास ५ हजार गावांमध्ये हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार कोपरगाव मतदार संघात जलयुक्त शिवार अभियान- २ योजने अंतर्गत गाव निवडीच्या निकषानुसार
मतदार संघातील २३ गावांचे गाव आराखडे व पाण्याचा ताळेबंदास नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये तालुकास्तरीय समितीची मान्यता देण्यात आली आहे. सदर गाव आराखडे तालुकास्तरीय समितीच्या मान्यतेने जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.
एकूण २३ गावांच्या १३३६ कामांसाठी ८.३४ कोटीच्या कामांचा आराखडा आहे. मागील दोन ते तीन वर्ष चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र चालू वर्षी पहिले तीन महिने अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यामुळे व ऐन पिकांच्या वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला व शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानी होवून अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान – २ योजने अंतर्गत कृषी, जिल्हा परिषद, लघु पाटबंधारे, ग्रामपंचायत, जल संधारण, वन विभाग, सामाजिक वनीकरण आदी कामांचा समावेश आहे.
जलयुक्त शिवार अभियान २ योजने अंतर्गत या २३ गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होवून पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.