Maharashtra News:काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान विकासावर बोलण्याऐवजी राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर जाणीवपूर्वक टीका करत आहेत. या टिकेतून निर्माण होणारा रोष त्यांना परवडणारा नाही.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याऐवजी ‘विकासात्मक कामांचे आपण कोणते दिवे लावले?’ असे टीकास्त्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सोडले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविषयी आढावा घेतला. यानंतर उपस्थित पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची यात्रा शांततेत पार पाडावी. यात्रेदरम्यान बोलायचे असेल तर विकासाच्या मुद्द्यावर बोलावे. परंतु त्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचे काम सुरू आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम जनतेला माहित आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करून जनतेच्या मनात निर्माण होणारा रोष राहुल गांधी यांना परवडणारा नाही.
देशात काही राज्यात काँग्रेसची सरकार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याऐवजी ‘काँग्रेस शासित राज्यात तसेच यात्रेत त्यांच्या सोबत असलेल्या व मंत्रीपदी राहिलेल्या काँग्रेस नेत्यांनी विकासाच्या बाबतीत काय दिवे लावले?’ यासंबंधी राहुल गांधी यांनी बोलावे. परंतु विकासकामांवर बोलण्याऐवजी जाणीवपूर्वक टीका टिपणी केली जात आहे.