गतिमंद मुलीचे अपहरण करत विक्री

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : करवंदे विक्रीसाठी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव येथे घेऊन जात एक लाखात विक्री करून तीचे लग्न लावून देणाऱ्या संशयित महिलेसह दोन जणांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशवाडी ( ता. इगतपुरी) येथे माहेरी असलेल्या महिलेची करवंदे खरेदी करताना एका अल्पवयीन गतिमंद मुलीसोबत ओळख झाली. महिलेने मुलीला विश्वासात घेऊन तिच्या गतिमंदपणाचा गैरफायदा उचलला.

संशयित महिला व तिचा पती योगेश शांताराम पाटील (रा. कासोदा, ता. एरंडोल) यांनी अल्पवयीन मुलीस तिच्या घरातील सदस्यांना कल्पना न देता घोटी येथून जळगाव जिल्ह्यात कासोदा येथे नेले व मनोज राजू शिंपी या संशयितास एक लाख रुपयांत तिची विक्री केली,

तसेच कुठेही वाच्यता न करता एका घरात लग्न लावून दिले. या मुलीला आपल्या घरदाराचा पत्तादेखील सांगता येत नसल्याने तिला महिनाभर अत्याचार सहन करावा लागला. पीडित मुलगी बेपत्ता म्हणून तिच्या घरच्यांनी अनेकदा तालुका परिसरात शोध घेतला होता.

अखेर त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फूस लावून नेणाऱ्या महिलेची पार्श्वभूमी पाहता खबऱ्यांमार्फत मुलीचा शोध घेत संशयितांना देखील अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.

हे कुटुंब गरीब असून, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा सराईत गुन्हेगारांनी घेतला आहे. या महिलेने या अगोदर अनेक गुन्हे केले असून तिची कसून चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. • निवृत्ती आगीवले, सामाजिक – कार्यकर्ते, इगतपुरी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe