Dombivli News : डोंबिवली मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वे मार्गाला जोडणारा मार्ग म्हणून दिवा ते वसई मार्ग ओळखला जातो. या मार्गावरून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या मेल एक्सप्रेस धावत असतात.
मात्र या गाड्यांना अप्पर कोपर रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने एकही मेल एक्सप्रेस थांबत नाही. त्यामुळे डोंबिवली परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असल्याने अप्पर कोपर रेल्वे स्थानकात मेल-एक्स्प्रेसला थांबा मिळावा, अशी मागणी डोंबिवलीकर प्रवासी नागरिक करीत आहेत.

दिवा-वसई रेल्वे मार्ग झाल्यावर प्रथम मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग एकमेकाना जोडले गेले, त्यामुळे अंतर कमी होऊन वेळ आणि पैशाची बचत होत असल्याने या मार्गाचे महत्व वाढले. पुढे हाच मार्ग कोकण रेल्वे मार्गाला जोडला गेला.
त्यामुळे या मार्गावरून देशाच्या विविध भागातून म्हणजे शेजारच्या गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशपासून दिल्ली, गोवा ते अगदी केरळपर्यंत जाणाऱ्या मेल एक्सप्रेस धावत असतात. या गाड्यांना वसई, भिवंडी रोड आणि थेट पनवेल असे थांबे देण्यात आले आहेत.
मात्र अप्पर कोपर रेल्वे स्थानक मध्य रेल्वे मार्गावर आणि डोंबिवलीसारख्या शहराजवळ असतानादेखील थांबा नसल्याने शहरातील नागरिकांना या गाड्यांनी प्रवास करायचा असेल तर भिवंडी, वसई किंवा पनवेल गाठावे लागते.
डोंबिवली, कल्याण परिसरात कोकणवासीय मोठ्या प्रमाणावर आहेत, आधीच मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गाड्या कायम गर्दीने फुल असतात. मात्र त्याचवेळी या मार्गे जाणाऱ्या गाड्यांना तेव्हढी गर्दी नसते. असाच प्रकार गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश परिसरात जाणाऱ्या डोंबिवलीकरांना गाडी पकडण्यासाठी दादर किंवा मुंबई सेन्ट्रल गाठावे लागते.
त्यामुळे अप्पर कोपर रेल्वे स्थानकात मेल-एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळाल्यास मोठी गैरसोय दूर होवू शकते. म्हणूनच अप्पर कोपर स्थानकात थांबा देण्यात यावा, त्यासाठी फलाटाची लांबी वाढविण्यात यावी, अशी मागणी आता डोंबिवलीकर प्रवासी करीत आहेत.