कृषिपंपांची सक्तीची वीजबिल वसुली तात्काळ थांबवा अन्यथा ‘या’ पक्षाने दिला आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- कृषिपंपांची सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबविण्यात यावी. अशी मागणी शिवप्रहार संघटनेच्या शिष्टमंडळाने काल रोजी विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता काकडे यांची समक्ष भेट घेऊन केली.

आधीच कोरोना, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होऊन उद्ध्वस्त झाला आहे.

त्यातच विद्युत वितरण कंपनीकडून होत असलेला वीज पुरवठा कमी दाबाचा व सातत्याने खंडित होत असतो. यामुळे शेतकऱ्यांचे विद्युत उपकरणे सातत्याने नादुरुस्त होणे व त्यायोगे शेती पिकांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होणे हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे.

विद्युत वितरण कंपनीने गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा न केल्याने शेतकऱ्यांचे जे नुकसान होते त्याची कुठलीही भरपाई शेतकऱ्यांना कधीच दिली जात नाही.

देशात बडे बडे उद्योजक जेव्हा तोट्यात जातात तेव्हा सरकारकडून त्यांना अब्जावधीची मदत विनासायास दिली जाते. दुसरीकडे मात्र मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा छळ केला जातो.

सर्वच शेतकऱ्यांची एकंदरीत खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा पाहता शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफी दिली गेली पाहिजे व शेती पंपांना मोफत वीज पुरवठा केला गेला पाहिजे.

सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी अन्यथा या विरोधात शिवप्रहार संघटनेच्या पुढाकाराने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं व्यापक आंदोलन उभारले जाईल असा इशारा शिवप्रहार संघटनेने दिला आहे.