Shaktipeeth महामार्गाच्या नावाखाली जमिनींची लूट ? हजारो शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक!

Published on -

Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्रातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबे आक्रमक झाली असून, बुधवारी मुंबईतील आझाद मैदानात मोठ्या संख्येने आंदोलनासाठी उतरली. हा महामार्ग त्वरित रद्द करण्याची मागणी करत, अन्यथा मोजणीसाठी येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या शेतात प्रवेश करू देणार नसल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला.

कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव व लातूर या १२ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार असून या भागातील शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत.

सरकारच्या या निर्णयाविरोधात लढा तीव्र करण्यासाठी येत्या ८ एप्रिल रोजी लातूरमध्ये मोठा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात मंत्री, आमदार यांच्या घरावर आंदोलने करण्यात येणार असून, सरकारचा निषेध म्हणून शेतात काळे झेंडेही लावण्यात येणार आहेत.

दरम्यान, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत सरकारवर टीका केली. ‘शिंदे यांनी महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. सरकारमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे दिसते,’ असे दानवेंनी म्हटले.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तर, ‘शेतकऱ्यांची मागणी नसताना हे रस्ते का तयार केले जात आहेत? यामागे पक्षनिधी मिळवण्याचा हेतू असल्याची’ गंभीर टीका केली. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही, ‘रत्नागिरी-नागपूर महामार्ग आधीच अस्तित्वात असून, त्याला जोडरस्त्यांची सोय करता येईल, त्यामुळे या नव्या महामार्गावर फेरविचार व्हावा,’ अशी मागणी केली.

सरकारचा हेतू लादण्याचा नाही – मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, ‘हा महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे, पण शेतकऱ्यांवर तो सक्तीने लादण्याचा सरकारचा हेतू नाही. चर्चा करून आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल,’ अशी भूमिका विधान परिषदेत स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की, ‘समृद्धी महामार्गाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्गामुळेही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन येईल. त्यामुळे या महामार्गाचा विरोध करण्याऐवजी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.’ या आंदोलनामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe