Latur Kalyan Expressway : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकत्याच संपन्न झाले असून या हिवाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान या अधिवेशनात लातूर – कल्याण महामार्ग प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती देण्यात आली. आता या प्रकल्पाबाबत नवीन अपडेट समोर येत आहे. मुंबई ते लातूर प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नवा एक्सप्रेसवे बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण–लातूर ‘जनकल्याण’ द्रुतगती महामार्ग हा राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहणार आहे. आता राज्य सरकारकडून या प्रकल्पाला तत्वतः मान्यता मिळाली असून एमएसआरडीसीने महामार्गाच्या संरेखनाचे काम सुद्धा सुरू केले आहे. या नव्या मार्गामुळे कल्याण ते लातूर हा प्रवास वेगवान होणार आहे. मराठवाड्याच्या एकात्मिक विकासासाठी हा प्रकल्प गेमचेंजर मानला जात आहे. दरम्यान आता हा प्रकल्प नेमका कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार आणि याचा रूट कसा असेल या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे.

कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा मार्ग
एमएसआरडीसी सुमारे चार हजार किलोमीटर लांबीचे नवीन महामार्ग विकसित करणार आहे. या एमएसआरडीसीच्या प्रस्तावित प्रकल्पात हा महामार्ग आधीपासून होता. मात्र, अनेक वर्षे या प्रकल्पाच्या फक्त चर्चा सुरू राहिल्यात. हा प्रकल्प केवळ फाईल बंद होता. मात्र नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचे सादरीकरण पाहिले अन सदर प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिलेत. त्यानंतर विधानसभेत त्यांनी या महामार्गाची अधिकृत घोषणा सुद्धा केली आणि अशा तऱ्हेने आता खऱ्या अर्थाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला.
आता राज्य सरकारच्या मान्यतेनंतर एमएसआरडीसीने सल्लागारामार्फत संरेखनाचे काम सुरू केले आहे. या महामार्गाचे अलाइनमेंट पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार आणि याचा रूट कसा राहणार याबाबत योग्य ती माहिती समोर येणार आहे. पण सध्या जी प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानुसार हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांतून जाणार आहे. याचा रूट उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर, औसा आणि निलंगा असा राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
मात्र, अंतिम संरेखन जाहीर झाल्यानंतरच या मार्गाचा रूट कसा असेल हे अधिकृतरीत्या समजू शकणार आहे. दरम्यान, हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. धाराशीवचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा महामार्ग धाराशीव आणि बीड जिल्ह्यांतूनच न्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दुसरीकडे, बीड जिल्ह्याला वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
एमएसआरडीसीने मात्र स्पष्ट केले आहे की, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या योग्य ठरणारे संरेखनच अंतिम केले जाईल. दरम्यान मंत्र्यांकडून सुरू झालेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग बीड आणि धाराशीव या दोन्ही जिल्ह्यांतील काही तालुक्यांतून जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तसेच याचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार अशी पण माहिती देण्यात आली आहे.