संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या असून, विशेष म्हणजे तो थेट चिकन शॉपपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे.
शनिवारी सायंकाळी इरिगेशन बंगला रोडवरील अरुण गायकवाड यांच्या शेळीला बिबट्याने आपले भक्ष्य बनवले. मात्र, त्यानंतर सोमवारी पहाटे बिबट्याने तौफिक अनिस भाई शेख यांच्या चिकन शॉपवर धाड घातली. ही घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसून आली आहे. बिबट्याचा रात्रीच्या वेळेस वाढता संचार आणि लोकवस्तीत त्याचा मुक्त संचार हा चिंतेचा विषय बनला आहे.

गेल्या काही दिवसांत अनेक नागरिकांनी बिबट्याच्या हालचालींविषयी वनविभागाला तक्रारी केल्या आहेत. अनिल बंदावणे यांच्या सीसीटीव्हीत देखील काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला होता. विशेषतः पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांसाठी हा धोका अधिकच वाढला आहे. आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द गावांतील नागरिक नियमितपणे प्रतापपूरच्या दिशेने सकाळी फेरफटका मारण्यासाठी जातात, मात्र आता त्यांनी या भागात जाणे टाळायला सुरुवात केली आहे.
शेती व्यवसाय आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही गंभीर परिस्थिती आहे. पाळीव प्राणी बिबट्याच्या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य बनत आहेत, परिणामी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावातील दूध उत्पादक आणि जनावरांचा सांभाळ करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी पिंजरा बसवावा आणि त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात यावे, अशी मागणी प्रगतिशील शेतकरी भगवानराव इलग, शिवाजी इलग, दूध उत्पादक रवींद्र बालोटे, सामाजिक कार्यकर्ते विनायकराव बालोटे, अनिस शेख, प्रभाकर निघुते, हरिभाऊ ताजणे, भाऊसाहेब ताजणे, अनिल बालोटे आदींनी केली आहे.