CM Eknath Shinde : राज्यात चांगला पाऊस पडू दे; मुख्यमंत्र्यांचे विघ्नहर्त्याला साकडे

Ahmednagarlive24 office
Published:
CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : श्री गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांनी श्री गणेशाची विधीवत पूजा, आरती करून प्रतिष्ठापना केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस उत्साहाचा असून विघ्नहर्ता गणरायाचे सर्वत्र आगमन झाले आहे. गेल्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला होता. यावर्षीदेखील गणेशोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा होत आहे. जी सार्वजनिक गणेश मंडळे नियमानुसार गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी द्यावी, मंडपासाठी शुल्क आकारणी करू नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात सुरू झाले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. भारताचे नाव जगभरात उज्ज्वल होत असून तो लौकिक अजून वाढविण्यासाठी गणपती बाप्पा पंतप्रधान मोदी यांना बळ देतील, आशीर्वाद देतील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जनहिताच्या विविध निर्णयांचे स्वागत केले.

हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना नियम बाजूला ठेवून मदत केली. मदतीची रक्कम दुप्पट मदत केली. शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजारांची मदत, एक रुपयात पीकविमा दिला आहे. संकट काळात शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe