Maharashtra Waterfalls : पालघर जिल्ह्यात असलेली निसर्गसंपदा मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.ग्रामीण भागातील डोंगरदऱ्या, अरुंद रस्ते व लहान-मोठे धबधबे पावसाळ्यामध्ये पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकतात.
पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वाडा-मनोर महामागाँवर असलेल्या वाघोटे येथे कोहोज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला सुंदर धबधबा नयनरम्य स्थळांपैकी एक असून अनेक पर्यटकांना हा धबधबा आता आकर्षित करत आहे.
![Maharashtra Waterfalls](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-वाघोटे-येथील-कोहोजचा-धबधबा.jpg)
वाडा तालुक्यातील वाडा-मनोर महामार्गांवर असलेल्या वाघोटे टोलनाक्याच्या पश्चिमेला असलेल्या कोहोज किल्ल्याच्या पायथ्याला एक धबधबा आहे.वाघोटे येथील टोलनाक्याजवळ वाहने उभी करून पश्चिमेला एक पायवाट किल्ल्याच्या दिशेने जाते.
काहीशी चिखलाची व जंगलातील वाटेने मजल दरमजल करताना वाटेत लागणाऱ्या अनेक लहान लहान व अतिशय सुंदर झऱ्यांचा अडथळा पार केल्यानंतर अचानक आपल्या दृष्टीला अगदी किल्ल्याच्या पोटातून खाली येणारा पांढराशुभ्र धबधबा पडतो खरेतर हा धबधबा तीन-चार टप्प्यात आहे.
पण त्यातील एक टप्पा आपल्याला सहज दिसतो त्यानंतर मुख्य धबधब्याच्या वर गेल्यावर अजून एक लांब पण कमी उंचीचा एक धबधबा अगदी घरातील भिंतीवर असलेल्या सुंदर पोस्टरप्रमाणे दिसतो. पावसातसुद्धा अगदी शुद्ध व नितळ पाणी खाली कोसळताना शुभ दुधासारखे दिसते,
तर कोहोज किल्ल्याच्या माथ्यावरून येणारे धुके, ढग यांच्यामुळे येथे आल्यानंतर मन प्रसन्न होते. वरून दिसणारा निसर्ग जणू स्वर्गासारखा भासतो. हा धबधबा बघितल्यानंतर आपण कोहोज किल्ल्याची चढाई देखील करू शकतो. तसेच येथे मनसोक्त थंड पाण्यात भिजल्याचा आनंद घेतल्यानंतर आणि किल्ल्याची चढाई केल्यानंतर मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील सातिवली येथील गरम पाण्याच्या कुंडामध्ये अंघोळीचा आनंद घेऊ शकतो.
मुंबई किंवा आजूबाजूच्या पर्यटकांसाठी एकाच दिवसात या तिन्ही स्थळांचा मनसोक्त आनंद घेता येतो. अहमदाबाद महामार्गापासून मुख्य रस्त्यावर असूनही अनेक दिवसांपासून हा धबधबा पर्यटकांच्या दृष्टीपासून लांब होता. मात्र पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक पर्यटनाच्या ठिकाणी पावसाळ्यात बंदी आणल्याने अनेक पर्यटक मोठ्या संख्येने या धबधब्याकडे आकर्षिले जाऊ लागले.
सर्वांना हा धबधबा व येथे येणारा ट्रेकिंगचा अनुभव हवाहवासा वाटू लागल्याने येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे, मात्र नेहमीप्रमाणे दारू पिणारे व धिंगाणा घालणारे पर्यटक आजही येथे अन्य पर्यटकांना अडथळा निर्माण करत आहेत.