Maharashtra News : केंद्रात व राज्यात महाआघाडीचे सरकार येणार आहे. सरकार आल्यावर कंत्राटी पद्धतीने नायब तहसीलदार भरण्याच्या आदेशाची होळी मंत्रालयाच्या दारात करणार आहोत. शाळा बंद करून दारूची दुकाने सुरू करणारे हे खोके सरकार जनताच उलथवून टाकेल, असा विश्वास संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
येथील संस्कार भवनात सुप्रिया सुळे यांनी महिला व जनतेशी मुक्त संवाद साधला, त्यावेळी सुळे बोलत होत्या.खासदार सुळे पुढे म्हणाल्या, महिलांचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव, बंद पडणाऱ्या शाळा सुरू करणे, आरोग्याच्या सेवा पुरविणे, एसटीबस सेवा दर्जेदार करणे, ही कामे करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. महाआघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहा. सेवा, सन्मान व स्वाभिमान, ही त्रिसूत्री अंमलात आणू.
स्व. गोपीनाथ मुंढे व प्रमोद महाजन यांनी भाजपा वाढविली. त्या दोघांच्या मुलींचे काय हाल आहेत, ते पहा. भाजपाने त्यांना न्याय द्यावा अन्यथा मोठी बहीण म्हणून मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील.
मोहटादेवीचे मी दर्शन घेतले. जे म्हणतात राष्ट्रवादी पक्ष आमचा आहे, त्यांनी मोहटादेवी समोर यावे. मी माझे सांगते त्यांनी त्यांचे मत मांडावे, मात्र शपथेवर खरे बोलावे. नांदेडला साठ लोकांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता.
नाशिकला (छगन भुजबळांनी) बोर्डावर यशवंतराव चव्हाणांचा फोटो लावला. ते कायम राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विरोधात असलेले नेते होते. त्यांची शिकवण तुम्ही घेतली नाही. फोटो मात्र वापरता तो अधिकार तुम्हाला आहे का ? राष्ट्रवादी कोणाची आहे, हे सर्वांना माहीत आहे.
देशातल्या अदृष्य शक्तीने बाळासाहेबांची शिवसेना फोडली व राष्ट्रवादीही त्यांनीच फोडली आहे. शरद पवार तीस वर्षे सत्तेत होते. त्यांनी सुडाचे राजकारण कधी केले नाही. दिल्ली, हिमालय असली तरी महाराष्ट्र रुपी सह्याद्रीने कायम दिल्लीला वाचविलेले आहे.
आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही. सध्या राजकीय दडपशाही सुरू आहे. एकीकडे खोके आणि दुसरीकडे ईडीची भीती, असा डाव चालू आहे. आम्हाला कितीही नोटिसा द्या, आम्ही लढत राहू, मी संसदेत विरोधी भाषण केले की लगेच माझ्या पतीला नोटीस पाठविली जाते. आम्ही उत्तर देतो.
शासन आपल्या दारीच्या नावाने जाहिराती केल्या जातात. जनतेचा पैसा पाण्यासारखा खर्च होतोय. आम्ही आमचे सरकार आले की हे बंद करू. आता निवडणुका आल्यात, त्यांच्याकडे पैसा आहे. माझ्याकडे इमानदारी आणि शरद पवार असल्याने मी कशालाही घाबरत नाही. लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्यात होतील, तयारीला लागा. देशात महाआघाडीचे सरकार येणार आहे असे सुळे यांनी सांगितले.