Maharashtra Board 12th Result 2024 : राज्यातील बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. राज्य बोर्डाकडून उद्या (दि.२१ मे) १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता (दि.२१ मे) हा निकाल जाहीर होईल. मागील काही दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी राज्य मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख दिली आहे. उद्या हा निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करण्याची आहे त्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर ५ जूनपर्यंत अर्ज करावा लागणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा घेतली गेली होती. ‘सीबीएसई’ परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता व निकालाची प्रतीक्षा विद्यार्थ्यांसह पालकांत होती.
अखेर आज (२० मे) राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सोमवारी बारावीच्या निकालासंदर्भातील पत्र प्रसिद्ध केले असून त्यानुसार मंगळवार, २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषद होणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 यादरम्यान बारावीच्या परीक्षा झालेल्या होत्या आता उद्या निकाल लागेल.
‘असा’ पहा निकाल
– mahresult.nic.in
– mahahsscboard.in
– hsc.mahresults.org.in
– hscresult.mkcl.org
– results.gov.in
या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहता येणार आहे. या साईटवर गेल्यावर तेथे महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल लिंक असेल त्यावर जाऊन HSC निकाल लिंकवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर तेथे
रोल नंबर आणि इतर क्रेडेन्शियल तुम्हाला टाकावे लागतील. त्यानंतर तुमचा निकाल तुमच्या समोर येईल.