Maharashtra farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवानो इकडे लक्ष द्या ! पावसाच्या अनियमिततेची शक्यता

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra farming : मुंबई : यंदाच्या पावसाळ्यावर अल-निनोचा प्रभाव असण्याची शक्यता सर्वच तज्ज्ञांनी वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई न करता कृषी विद्यापीठांच्या सल्ल्याकडे लक्ष देऊन शेतीची कामे करावीत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले. खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे.

आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले .

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आगामी खरीप हंगामाची उत्तम पूर्वतयारी झाली आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण पथके, भरारी पथके कार्यान्वित करावीत. लिंकेजच्या तक्रारी आल्या, तर तातडीने कारवाई करावी. शेतकऱ्यांसाठी पुरेसे बी-बियाणे, खतांचा साठा उपलब्ध असून ते वेळेत मिळतील, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. यंदाच्या मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू

पावसाच्या अनियमिततेची शक्यता

पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओल पाहूनच शेतकऱ्यांनी पेरण्यांचा निर्णय घ्यावा. त्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवण्यात येणारे बियाणे दर्जेदार असावे. त्याची मी स्वतः प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार आहे.शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जाचा पुरवठा करावा. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना करत शिंदे म्हणाले, अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शेतीपूरक व्यवसाय, कृषी पर्यटनावर भर द्यावा. जलयुक्त शिवार योजनेची भूजल पातळी उंचावण्यास मदतच झाली आहे, असेही ते म्हणाले.

पावसाळ्यावर अल-निनोचा प्रभाव

बैठकीला मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले, यंदाच्या पावसाळ्यावर अल-निनोचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अन्य दोन घटक पावसाला अनुकूल आहेत. त्यानंतरही पावसाने ओढ दिली, तर कृषी विद्यापीठांनी पेरण्यांचे वेळापत्रक निश्चित करावे. त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाने जनजागृती करावी. बोगस बियाणे, खते विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी.

वेळप्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावेत. शेतकऱ्यांची कृषी कर्जासाठी अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करावा. पीक कर्ज वितरणाला गती द्यावी. जिल्हा प्रशासनाने पीक कर्ज वितरणाचा नियमितपणे आढावा घ्यावा.

पावसाळा सुरू होईपर्यंत तलावातील गाळ काढणे, बांधबंदिस्ती, जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी. हवामान केंद्र अद्ययावत करावीत. आगामी काळात पिकांचे पंचनामे करताना मानवी हस्तक्षेप टाळून तो ई- पीक पाहणीच्या माध्यमातूनच झाला पाहिजे. तसेच ऊर्जा विभागाने जोडण्यांची संख्या वाढवावी. याशिवाय मुख्यमंत्री सौरऊर्जा विभागाला सर्व विभागांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe