देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा, भारतातील प्रगतशील राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक – बाळासाहेब थोरात

Published on -

संगमनेर-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतेच्या व बंधुभावाच्या विचारांवर काम करणारा महाराष्ट्र हा विकासात देशात अग्रगण्य आहे. मानवता धर्माचा विचार देणाऱ्या महाराष्ट्राचा देशाच्या विकासात मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शेतकी संघ यशोधन कार्यालय येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ जयश्रीताई थोरात यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतामध्ये विविधता आहे. विविध जाती जमाती समाज हा भारतीय या नावाखाली एकत्र आनंदाने राहतो आहे. लोकशाही व राज्यघटना ही आपली ताकद आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये अनेकांनी हुतात्मे पत्करले. एक मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राची घडी बसवली. शेती, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास ,साहित्य, कला, संस्कृती, औद्योगीकरण, जलसंधारण, विविध पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राने मोठी प्रगती केली. आर्थिक समृद्धता निर्माण केली. त्यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये कायम महाराष्ट्राचा वाटा मोठा राहिला आहे.

महाराष्ट्र दिनाबरोबर आज कामगार दिन ही सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कायम कामगार व कष्टकरी बंधूंचा मोठा वाटा राहिला आहे. सध्या मात्र जातीभेदाच्या नावावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असून समतेचा व मानवतेचा महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

अमृत उद्योग समूहातही थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी कॉलेज सह्याद्री शिक्षण संस्था यांसह संगमनेर तालुक्यातील विविध गावे व विविध संस्थांमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe