एसटी महामंडळाकडे निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठीची आजन्म मोफत पासची सुविधा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुदत दोन महिन्यांऐवजी सहा महिने करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघाचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे.
२०१८ मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सहा महिने मोफत प्रवासाचा पास देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले असले तरी दुसऱ्या बाजूला ही सुविधा मर्यादित कालावधीसाठी असल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या आणि निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/06/ahmednagarlive24-a61ef03e4c09d6ee2c638fd70f445a57_original.jpg)
एसटी महामंडळात जवळपास ८६ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. एसटीच्या ७५ वर्षांच्या कालखंडात प्रत्येक कामगाराचे मोलाचे योगदान आहे. नैसर्गिक आपत्ती असो अथवा कोरोनासारखे वैश्विक संकट कर्मचाऱ्यांनी अविरतपणे आपली भूमिका बजावली आहे.
काही वर्षांपूर्वी महामंडळातील निवृतीनंतर कर्मचाऱ्यांना कुटुंबासह धार्मिक पर्यटन करता यावे, यासाठी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली. या मागणीचा विचार करत निवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांकरता अखेर मोफत प्रवासाचा पास देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.
यामुळे मोफत प्रवसाची संधी उपलब्ध झाली, तर कार्यरत कर्मचाऱ्यांना दोन महिने मोफत एसटी प्रवासाचा पास देण्यात आला; परंतु आपले संपूर्ण आयुष्य प्रवाशांची वाहतूक करत असताना निवृत्तीनंतर अथवा कार्यरत असताना कर्मचाऱ्यांना कुटुंबासमवेत फिरण्यासाठी मोफत पासचा मर्यादित कालावधी का ? असा प्रश्न कर्मचारी संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे दरम्यान,
याबाबत संघटनेने वारंवार महामंडळाकडे पत्रव्यवहारा आहे. एसटीचा ७५ वर्षांचा प्रवास आज कर्मचाऱ्यांमुळेच शक्य झाला आहे. विविध कारणांनी आर्थिक संकटात असतानाही मिळणाऱ्या सुविधांनाही मर्यादा का? निवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांऐवजी आजन्म मोफत पास मिळावा तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांऐवजी सहा महिने मोफत पास मिळावा, अशी आमची महामंडळाकडे मागणी आहे. – संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघ