Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस राज्याच्या अनेक भागांत सक्रिय झाला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र, कोकण भागात अनेक ठिकाणी, विदर्भ व मराठवाड्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस पडला आहे.
दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात यलो व ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून, जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याबरोबरच मान्सून स्थिर होणार असून, महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. रविवारी सायंकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील लोहगावमध्ये २ मिमी, जळगाव ८, कोल्हापूर ०.७, महाबळेश्वर ९, नाशिक ४, सांगली ०.३, सातारा ३ तर सोलापूरमध्ये ०.३ मिमी पावसाची नोंद झाली.
कोकण भागातील मुंबईत ३ मिमी, सांताक्रुझ ३, रत्नागिरी ४, तर डहाणूमध्ये १ मिमी पाऊस बरसला आहे. मराठवाड्यातील बीडमध्ये ३ मिमी पाऊस पडला. विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला असून, अकोल्यामध्ये ४ मिमी, अमरावती १०, ब्रह्मपुरी ३, चंद्रपूर २,
गोंदिया २, नागपूर २१, वाशीम ३१, वर्धा १, तर यवतमाळमध्ये ८ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान सांताक्रुझमध्ये ३१.७ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वरमध्ये १७.६ अंश सेल्सिअस इतके होते.
१७ ते २० जुलै दरम्यान कोकण भागात ऑरेंज व यलो अॅलर्ट असून, येथे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ऑरेंज अॅलर्ट असून, येथे जोरदार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, तर विदर्भात तुरळक भागात मुसळधार पाऊस तसेच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.