Maharashtra Schools : ऑगस्ट महिन्याप्रमाणेच सप्टेंबरमध्येही पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात परिस्थिती बिकट बनली आहे. खानदेशात सुद्धा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. यामुळे आता महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. गत काही दिवसांपासून राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.

पुढील काही दिवस महाराष्ट्रात अशीच स्थिती राहणार आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आज काही जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पूरजन्य परिस्थितीमुळे काही ठिकाणी धोकादायक परिस्थिती तयार झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज 23 सप्टेंबर रोजी काही जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील सर्वच शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
खरंतर सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यातील त्या त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्हा करिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
सक्षम प्राधिकारी म्हणून देण्यात आलेल्या याच अधिकाराचा वापर करून बीड जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार बीड जिल्ह्यात दि.22.09.2025 पासून मुसळधार पाऊस चालू आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तसेच तालुक्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याने बीड जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय) मधील विद्यार्थ्यांना दि. 23.09.2025 रोजी सुट्टी मंजूर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानिक शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना आज जिल्हाधिकारी महोदय यांनी सुट्टी दिली आहे.
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शाळांना सुद्धा आज सुट्टी राहणार आहे. काल घटस्थापना निमित्ताने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान आज घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सुट्टी राहणार असल्याची बातमी समोर आली आहे.