मोदी आवास योजनेचा मराठा कुणबी यांना लाभ द्यावा

Published on -

Modi Awas Yojana : केंद्र सरकारच्या नव्यानेच राबविण्यात येत असलेल्या मोदी आवास योजनेचा मराठा कुणबी प्रवर्गातील ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या कुटुंबातील सदस्यांना मोदी आवास योजनेतील घरकुलाचा लाभ मिळावा,

अशा मागणीचे निवेदन शेवगाव तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गटविकास अधिकारी राजेश कदम यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, मोदी आवास योजनेंतर्गत ओबीसी घटकांसाठी घरकुल योजनेसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत विभागाला पत्र देऊन प्रत्येक ग्रामपंचायतमार्फत विशेष ग्रामसभा लावून पात्र लाभार्थ्यांकडून घरकुल योजनेसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

यामध्ये मराठा कुणबी प्रवर्गातील लाभार्थी निवडताना एखाद्या कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावे कुणबी प्रमाणपत्र असेल त्याच सदस्याला या योजनेचा लाभ दिला जाणारा असून, कुटुंबातील इतर सदस्यांना त्याचा लाभ दिला जाणार नाही,

म्हणजे कुटुंबातील पतीच्या नावे कुणबी प्रमाणपत्र असेल आणि पतीचे निधन झाले असेल तरी त्या कुटुंबातील पत्नी किंवा मुलांना प्रमाणपत्राअभावी या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे ग्रामसेवक ग्रामसभेत सांगतात,

म्हणजेच कुटुंबातील पती कुणबी आणि पत्नी आणि मुले, आजोबा, चुलते मराठा कसे, असा प्रश्न मराठा महासंघाने उपस्थित केला असून, कुटुंबातील कुठल्याही सदस्याकडे कुणबीचे प्रमाणपत्र असल्यास त्याच कुटुंबातील इतर सदस्यांना त्याच

प्रमाणपत्राच्या आधारे घरकुल योजनेचा लाभ मिळावा तसेच कुटुंबातील कुठलेही एक कुणबी प्रमाणपत्र ग्राह्य धरून गोरगरीब मराठा कुणबी कुटुंबातील लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा.

केवळ प्रस्तावकाच्या नावे कुणबी प्रमाणपत्र नाही म्हणून जर शासन प्रस्ताव नाकारत असेल तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस रावसाहेब मरकड, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फसले, रामनाथ रुईकर, प्रवीण खोमणे, राजेंद्र पोटफोडे, गौतम सुरासे, भीमराज बेडके राजेंद्र पातकळ, गणेश म्हस्के, चंद्रकांत निकम, विष्णू दुकळे, बाळासाहेब भागवत. सुनील रणमले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News