Manoj Jarange Patil : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूपच गरम आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आता वज्रमूठ आवळली आहे.
सध्या मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी असंख्य मराठा बांधवांना सोबत घेत मुंबईकडे कूच केली आहे. राजधानी मुंबईत पोहोचल्यानंतर तेथील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण सुरू करणार आहेत.
दरम्यान वीस जानेवारीपासून हा मोर्चा सुरू झाला असून अंतरवली सराटी येथून निघालेला मोर्चा सध्या लोणावळ्यापर्यंत पोहचला आहे. विशेष म्हणजे आज हा मोर्चा नवी मुंबई येथे पोहोचणार आहे. तसेच उद्या म्हणजे 26 जानेवारी 2024 रोजी हा मोर्चा मुंबई येथील आझाद मैदानात दाखल होणार आहे.
जसा-जसा मोर्चा पुढे जात आहे तसा मोर्चाला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचे पाहायला मिळतय. असंख्य मराठा बांधव मोर्चात सहभागी झालेले आहेत. काल हा विराट मोर्चा लोणावळ्यात पोहोचला. काल लोणावळ्यात या मोर्चाचा मुक्काम होता.
दरम्यान आज लोणावळ्यात मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी पाटील यांनी भावनिक भाषण देखील केले. यावेळी त्यांनी मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा सरकारला दिला.
तसेच त्यांनी त्यांची प्रकृती साथ देत नसल्याचेही म्हटले आहे. यामुळे मोर्चात सहभागी झालेले आंदोलनकर्ते खूपच भावुक झालेत. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, “काल मोर्चामध्ये पाचच्या सुमारास मला गाडीत अचानक झोप लागली.
माझ्या माय-माऊलींनी झोपेतच मला ओवाळलं. मात्र काल रात्री झोप झाली नाही. या ठिकाणी सकाळी सव्वासातला पोहोचलो. मागील 48 तास झाले शरीराला झोपच नाही. त्यामुळे सकाळी अचानक थोडी झोप लागली. आता कान दुखतोय,
वात आल्यासारखं वाटतंय. माझे पाय सुजले आहेत. पाय उचलता येईना, म्हणून इथे पोहोचायला थोडा उशीर झाला.” भाषणात पाटील यांनी तब्येत साथ देत नसल्याचे सांगितल्याने मराठा समाजात भावनिक लाट पसरली. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे भाषण सुरू असतानाच भावुक झाले.
दरम्यान त्यांनी आपल्याला थेट मुंबई गाठायची आहे आता फक्त एक मुक्काम बाकी असून मी माझ्या आयुष्यात एवढी गर्दी पाहिली नव्हती असे देखील नमूद केले आहे. तसेच त्यांनी मोर्चामध्ये घातपात होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन आंदोलनकर्त्यांना केले आहे.
कुणी जर अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला थेट पोलिसाच्या स्वाधीन करा असे आवाहन यावेळी पाटील यांनी मोर्चात सहभागी झालेल्या समस्त मराठा समाजाला केले आहे.