Matheran News : पर्यटकांसाठी मोठी बातमी ! माथेरान बंद अखेर मागे

Published on -

Matheran News : माथेरानमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला बंद अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. दस्तुरी येथे पर्यटकांची सातत्याने होणारी फसवणूक थांबवण्यासाठी स्थानिकांनी बंद पुकारला होता. मात्र, अधिकाऱ्यांना ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यानंतर माथेरानकरांचे समाधान झाले आणि १९ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता व्यवहार सुरळीत करण्यात आले.

माथेरानमध्ये पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याच्या आरोपावरून माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने बंदची हाक दिली होती. यामुळे पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर, आमदार महेंद्र थोरवे यांनी विधीमंडळ अधिवेशन सोडून माथेरानमध्ये तातडीची बैठक घेतली आणि तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला.

१९ मार्च रोजी बाळासाहेब ठाकरे सभागृहात आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित करण्यात आली. उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे, तसेच अश्वचालक, माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती आणि इतर स्थानिक संस्था यांच्या प्रतिनिधींनी या चर्चेत सहभाग घेतला.

संघर्ष समितीने प्रशासनावर पर्यटकांच्या फसवणुकीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला. त्यानंतर पर्यटकांसाठी आवश्यक उपाययोजना ठरवण्यासाठी मंथन करण्यात आले.

दस्तुरी येथे पर्यटकांसाठी माहिती केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार नियंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. अधिकृत वेबसाइट सुरू करून पर्यटकांना आवश्यक माहिती पुरवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

घोडेवाल्यांनी गाड्यांच्या मागे धावण्याच्या प्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय झाला. दरपत्रकासंदर्भात प्रत्येक संस्थेचे प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले. आठवड्यातून एकदा आमदार महेंद्र थोरवे संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणार असल्याचे निश्चित करण्यात आले.

स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे माथेरानमध्ये बंद पुकारण्याची वेळ आली. मात्र, आमदारांच्या मध्यस्थीमुळे ठोस उपाययोजना निश्चित झाल्यानंतर स्थानिकांनी बंद मागे घेतला. यामुळे माथेरान आता पर्यटकांसाठी पुन्हा खुलं झालं असून, भविष्यात अशा समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासन अधिक सतर्क राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe