धनगर आरक्षण : बैठक घ्यायची, चर्चा करायची, कृती काहीच नाही ! लबाडीचा खेळ राज्य सरकारकडून सुरु

Ahmednagarlive24 office
Published:
Dhangar reservation

Dhangar reservation : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची पन्नास दिवसात अंमलबजावणी करण्याच्या लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्याने यशवंत सेनेने चौंडी (ता. जामखेड) येथे पुन्हा शुक्रवारपासून (दि. १७) उपोषण सुरु केले आहे.

यासंदर्भात यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले की, धनगर समाजाच्या अनूसुचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे सप्टेंबरमध्ये एकवीस दिवसांचे आमरण उपोषण झाले.

त्यावेळी राज्य शासनाने यशवंत सेनेला ५० दिवसात आरक्षण अंमलबजावणी करण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र पन्नास दिवसांत आरक्षण अंमलबजावणी संदर्भात राज्य शासनाने काहीच निर्णय घेतला नाही.

उपोषणकर्त्यांबरोबर बैठक घ्यायची, चर्चा करायची, परंतु कृती काहीच करायची नाही, असा लबाडीचा खेळ राज्य सरकारकडून सुरु असल्याचा आरोप दोडतले यांनी केला. त्यामुळे यशवंत सेनेने पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे.

यावेळी स्वतः बाळासाहेब दोडतले, मागील उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर, सुरेश बंडगर आमरण उपोषणास बसले असून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील म्हणाले, ५० दिवसात आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी शासन निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमून केंद्र सरकारला शिफारश करून

दोन महिन्यात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे तसेच चार राज्यांचा आरक्षण अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमण्याची व राज्यातच शासन निर्णय काढण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र यातील काहीही झाले नाही. एकूणच राज्य सरकार धनगर समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत असल्याचे म्हणाले.

यावेळी प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, प्रा. आण्णासाहेब रुपनवर, नितीन धायगुडे, किरण धालपे, बाळा गायके, दत्ता काळे, स्वप्निल मेमाणे, अक्षय शिंदे, कृष्णा बोबडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe