आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश ; १० कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : मिरजगाव येथे ५० खाटांच्या अद्ययावत उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी सुमारे १० कोटी ५६ लाख रुपये इतका निधी शिंदे – फडणवीस – पवार सरकारने मंजूर केला असून, त्यासाठीची निविदा सूचनाही दि. ६ सप्टेंबर रोजी निघाली आहे. यामुळे येथील रुग्णांना आणखीन चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, मिरजगावकरांचे मागील अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे अद्ययावत ट्रामा सेंटर असावे, अशी मिरजगावकरांची मागणी होती त्या अनुषंगाने आ. राम शिंदे हे सातत्याने पाठपुरावा करत होते. मात्र, काही तांत्रिक कारणाने हे काम होऊ शकले नाही, परंतु आ. शिंदे यांनी मागील काळात मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून ६ कोटी रुपये मंजूर करून आणले होते.

त्यानंतरही आ. शिंदे यांनी उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा सुरूच ठेवल्याने दि.६ सप्टेंबर २०२३ रोजी मिरजगाव येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी निविदा सूचना निघाली आहे. त्यामुळे आ. शिंदे यांनी सरकार दरबारी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.

मिरजगाव हे नगर- सोलापूर हायवेवर येत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात अपघातांच्या घटना घडत असतात. याशिवाय या भागातील नागरिकांना सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी नागर किंवा कर्जत येथे उपचारासाठी जावे लागत असायचे.

या भागात अद्यावत ट्रामा केअर सेंटर असावे, अशी मागणी होती. आ. शिंदे हेही याबाबत आग्रही होते. परंतू ही मागणी तांत्रिक कारणाने मागे पडली होती. दरम्यान, मिरजगाव भागातील आरोग्याच्या समस्या दूर व्हाव्यात, यासाठी आ. प्रा. राम शिंदे सातत्याने प्रयत्न करत होते.

मिरजगाव हे बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. या भागात नेहमी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मिरजगाव शहराजवळून जाणाऱ्या नॅशनल हायवेवर सतत भीषण अपघात होतात. मोठी वैद्यकीय सुविधा नसल्याने अपघातग्रस्तांचा उपचाराअभावी दुर्दैवाने मृत्यू होतो;

परंतू आता मिरजगाव येथे उपजिल्हा रुग्णालय होणार असल्याने अपघातग्रस्तांना तातडीची अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा व उपचार मिळणार आहेत. यामुळे अनेक रूग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल. जनतेचा जिव्हाळयाचा प्रश्न मार्गी लागल्याने मिरजगाव व परिसरातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe