Maharashtra News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने सोमवारी बीड जिल्ह्यात घेतलेल्या हिंसक वळणाने राज्यातील सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधी सावध झाले असून काहींनी आपली कुटुंब निवासस्थान सोडून अन्यत्र हलवली आहेत. मराठवाड्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातील अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अनेक गावांच्या वेशीवर प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आले आहेत.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात येऊ देणार नाही, असा इशाराही आंदोलकांकडून देण्यात येत आहे. आंदोलकांच्या या निर्णयामुळे राज्यातील आमदार, खासदार तसेच इतर राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. मतदारसंघात त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी जरांगे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर आक्रमक झालेल्या संतप्त जमावाने सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत त्यांच्या गाड्या पेटवून दिल्या. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, तसेच आता भाजपमध्ये असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घराचीही जमावाने जाळपोळ केली.
मतदारसंघात फिरताना नांदेडचे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली, तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. माजी मंत्री बबनराव लोणीकर, तसेच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनाही या आंदोलनाचा फटका बसला.
ज्या जनतेकडून आमदार, खासदारांना मोठ्या प्रमाणात मान-सन्मान आदर मिळत होता, त्यांची पावले आपल्या गावाला आणि घराला लागावीत यासाठी धडपड केली जात होती, त्यांच्याकडूनच राजकीय मंडळींना गावबंदी आणि पुढे घरे गाड्या जाळण्यापर्यंत मजल गेल्याने लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाचा चांगलाच धसका घेतला आहे.
आंदोलन उग्र झालेल्या मराठवाडा विभागातील अनेक आमदार सध्या भीतीच्या छायेत असल्याचे चित्र आहे. याची झळ आपल्या कुटुंबीयांना बसू नये म्हणून अनेक लोकप्रतिनिधींनी आपले कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केल्याचे समजते.













