Pune News : राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील ( ओबीसी ) पात्र कुटुंबांसाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने स्वतःच ही योजना तयार केली असून, त्याची अंमलबजावणी आता पुणे जिल्ह्यातही करण्यात येत आहे. पुणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक शालिनी कडू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुणे जिल्ह्यात अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती, भटक्या जमातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना उपलब्ध आहेत.
मात्र, इतर मागास प्रवर्गासाठी अशा कोणत्याही प्रकारची योजना अस्तित्वात नव्हती. त्यामुळे या प्रवर्गातील कुटुंब पात्र असूनही घरकुल योजनेपासून वंचित राहत होते. त्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागास प्रवर्गासाठी तीन वर्षांत १० लाख घरे पूर्ण करण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळात मान्य करण्यात आला. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने नुकताच त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
यासंदर्भात शालिनी कडू म्हणाल्या, पंतप्रधान आवास योजनेत अपात्र ठरलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. या योजनेत पात्र राहूनही इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना लाभ मिळत नव्हता. त्यांचे मात्र आता मोदी आवास योजनेतून घरकुल योजनेतून घराचे स्वप्न पूर्ण होईल.
इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजारपेक्षा जास्त नसावे. कुटुंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. गृहकर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा, अशी अट असणार आहे.