Maharashtra News : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू केले आहे. नाशिकमधील काळाराम मंदिरातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या सेवेद्वारे त्यांनी या अनुष्ठानाला सुरुवात केली आहे.
नाशिक दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ट्विटवरील एक ऑडिओ संदेशाद्वारे आपल्या या अनुष्ठानाची माहिती दिली. जीवनाचे काही क्षण ईश्वराच्या आशीर्वादामुळेच प्रत्यक्षात उतरत असतात. आज जगभरातील राम भक्तांसाठी असेच पवित्र वातावरण आहे.
सर्वत्र प्रभू श्रीराम यांच्या भक्तीचे अद्भुत वातावरण आहे. चारही दिशांना रामनामाचा जप ऐकू येतोय. प्रत्येक जण वाट पाहतोय २२ जानेवारीची. आता अयोध्येत प्रतिष्ठापनेसाठी फक्त ११ दिवस उरले आहेत. मला या पुण्यप्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. माझ्यासाठी ही कल्पनेच्या पलीकडची अनुभूती आहे.
मी भावुक झालो आहे. पहिल्यांदा आयुष्यात मी अशा प्रकारच्या मानसिक स्थितीतून जात आहे. अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षं जे स्वप्न उराशी बाळगले होते, मला त्या स्वप्नपूर्तीवेळी उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले आहे. ईश्वराने मला सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निमित्त बनवले आहे.
ही फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू केले आहे, असे मोदी म्हणाले. यासाठी त्यांनी जनता-जनार्दनाचे आशीर्वाद देखील मागितले. हा क्षण शब्दात सांगणे अवघड आहे. शास्त्रानुसार आपल्याला ईश्वराची आराधना करण्यासाठी स्वतःमध्येही दैवी चेतना जागृत करावी लागते. शास्त्रांमध्ये प्रतिष्ठापनेसाठी कठोर व्रत-वैकल्य सांगितली आहेत.
या नियमांचे प्राणप्रतिष्ठेच्या आधी पालन करावे लागते. त्यामुळेच आध्यात्मिक व्यक्तींच्या मार्गदर्शनात मी आजपासून ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू करतोय. या पवित्र क्षणी मी परमात्म्याच्या चरणांशी, जनतेला प्रार्थना करतोय. तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या.
जेणेकरून माझ्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही. माझे भाग्य आहे की, या अनुष्ठानाची सुरुवात मी नाशिकधाम पंचवटीपासून करतोय पंचवटीमध्ये प्रभू श्रीराम यांनी बऱ्याच कालावधीसाठी वास्तव्य केले होते, असे मोदींनी नमूद केले.
पंतप्रधानांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. तसेच आपल्या आईची देखील आठवण काढली.