शेवगाव :- शेतात शौचालयासाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलमधे चित्रीकरण करुन विनयभंग केल्याची घटना रविवारी शेवगाव शहरालगच्या एका गावात घडली.
चित्रीकरण इतरांना दाखविण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शहरालगतच्या गावात एक महिला आपल्या मुलीसोबत राहते. महिलेच्या पतीचे निधन झाले आहे.
सदर महिला तीन फेब्रुवारी रोजी सकाळी स्वतःहाच्या शेतात शौचास गेली होती. तेथे तिला दहा फूट अतंरावर एक मोबाइल व त्याचा कॅमेरा सुरू असल्याचे दिसले.
महिलेने मोबाइल घेतला, तेंव्हा कॅमेरा सुरू होता व चित्रीकरणही सुरू होते. महिलेने मोबाइल घरी आणला. त्यानंतर थोड्याच वेळात ज्याचा मोबाइल होता, तो युवक महिलेच्या घरी आला व मोबाइल मागू लागला.
मोबाइल देण्यास महिलेने नकार दिल्यानंतर ‘तुझे आणखी व्हिडिओ माझ्याकडे आहेत. ते सगळ्यांना दाखविल,’ अशी धमकी त्या युवकाने दिली.
त्यानंतर महिलेने ९ फेब्रुवारी रोजी तिच्या पुतण्याला घटना सांगितली. त्याने युवकाची भेट घेतली असता त्याने त्यालाही शिवीगाळ करुन धमकी दिली.
सोमवारी महिलेने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंग व धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून आरोपी फरार झाला आहे.