महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेत दरमहा १५०० रुपये मिळत असलेल्या महिलांच्या भवितव्याबाबत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी मोठा दावा करत, ही योजना हळूहळू बंद केली जाईल असा गंभीर आरोप केला आहे. या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून या योजनेचे पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी आर्थिक मदत म्हणून ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती. तसेच, महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी हे अनुदान २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतरही अद्याप या रक्कमेबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण होत आहे.

काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने सध्या या योजनेतील ५० लाख महिलांची चौकशी सुरू केली आहे आणि त्यातील अनेक महिलांना अपात्र ठरवून योजना बंद करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.
त्यांनी असेही म्हटले की, “सरकारच्या तिजोरीतून मते खरेदी करण्यासाठी ही योजना आणण्यात आली होती. वास्तविक ही योजना महिलांसाठी नव्हतीच, तर फक्त निवडणूक प्रचाराचा एक भाग होती. आता सरकार हे पैसे देण्याचे टाळण्यासाठी विविध निकष लावत आहे.”
महिलांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आता बंद होणार का, याबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे. सरकारकडून अद्याप या योजनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, महिलांचे नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या चर्चांना जोर आला आहे.
राजकीय वर्तुळातही या योजनेवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावर सरकारवर टीका करत महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून लाखो महिलांनी आर्थिक मदतीसाठी या योजनेचा लाभ घेतला. मात्र, जर ही योजना हळूहळू बंद होत असेल तर महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर मोठा परिणाम होईल.
ही योजना पुढे सुरू राहील की बंद केली जाईल, यावर सरकारच्या पुढील धोरणांवर आणि अधिकृत घोषणेवर अवलंबून आहे. सध्या सुरू असलेल्या चौकशीनंतर जर मोठ्या प्रमाणात लाभार्थी अपात्र ठरवले गेले, तर त्याचा थेट परिणाम हजारो महिलांच्या आर्थिक स्थितीवर होईल.
विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असून यासंदर्भात विधानसभेत आणि लोकसभेत आवाज उठवण्याचे संकेत दिले आहेत. भविष्यात सरकार या योजनेसंदर्भात कोणते निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
‘लाडकी बहीण’ योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, सध्या ती राजकीय संघर्षाचा विषय ठरत आहे. ही योजना खरंच बंद होणार का, सरकार नवीन निकष लागू करून लाभार्थ्यांची संख्या कमी करणार का, यावर येत्या काळात चित्र स्पष्ट होईल. सरकारने महिलांसाठी घेतलेले निर्णय आणि विरोधकांचा विरोध यातून लाडकी बहीण योजनेचे भवितव्य ठरेल.