मुळा, प्रवरेवरील बंधारे भरून द्यावेत : आ. गडाख

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : समन्यायी कायद्याच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरण समूहातून मराठवाड्याला पाणी सोडताना मुळा-प्रवरा नद्यांवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्याची आग्रही मागणी माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख यांनी जलसंधारण विभागाच्या नाशिक येथील मुख्य अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावरून मध्यंतरी मोठे रणकंदन माजले होते. धरणांत

पुरेसा पाणी साठा दिसत असला तरी लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने आगामी काळात त्यांनाच या पाण्याची गरज पडणार असल्याने

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तरी यातून मराठवाड्यासाठी पाणी सोडू नये, अशी भूमिका मांडली जात होती. मराठवाड्याला पाणी सोडण्याविरोधात लाभक्षेत्रात असंतोषाची खदखद बाहेर पडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.

आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली घोडेगाव येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलन तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेऊन मराठवाड्याला पाणी सोडण्यास असलेला निर्णय झाल्यानंतर तातडीने आ. शंकरराव गडाख यांनी यांनी जलसंधारण विभागाच्या नाशिक येथील मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने (दि.३०) ऑक्टोबर २०२३ रोजी लेखी आदेश काढले आहेत.

मात्र याप्रश्नी उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने तो न्यायप्रविष्ठ बनला असल्याकडे त्यांनी मुख्य अभियंत्यांचे लक्ष वेधले आहे. नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलन केल्याची बाब त्यांनी याद्वारे निदर्शनास आणून दिली आहे.

मात्र असे असतानाही नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेल्याचे स्पष्ट करून सदरच्या आदेशानुसार मुळा व भंडारदरा धरण समूहातून मराठवाड्यासाठी पाणी सोडल्यानंतर या पाण्यातून मुळा तसेच प्रवरा नदी पात्रातील नेवासा तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे फळ्या टाकून पूर्ण क्षमतेने भरून देण्याबाबत संबंधितांना सूचित करण्याची आग्रही मागणी आमदार गडाख यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe