Maharashtra News : एक तपाहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असून यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे.
उर्वरित दुसऱ्या लेनच्या रस्त्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत दिली. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांना यंदा गणपती पावणार असून गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या वाहनाने गावी जाता येणार आहे.
मंत्री चव्हाण म्हणाले, डोंबिवलीतील सर्वच रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यासाठी यापूर्वीच निधी मंजूर झाला आहे. थोडासा विलंब झाला असला तरी अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. आता पावसाळा सुरू झाल्यावर खड्डे पडल्याने पुन्हा या रस्त्याची चर्चा केली जात आहे.
मात्र एका दिवसात जादूच्या कांडी सारखे रस्ते करता येत नाहीत. प्रत्येक काम पूर्ण व्हायला कमीत कमी एक ते जास्तीत जास्त दोन अडीज वर्षांचा कालावधी लागणारच आहे. मानपाडा रस्ता व डोंबिवली पेंढारकर कॉलेज रस्त्याचे कामदेखील मंजूर झाले असून येत्या दोन वर्षांत या रस्त्याचे काम पूर्ण करायचे आहे.
रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत नागरिकांना त्रास थोडासा होणार आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. पुढे मंत्री चव्हाण म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून या विभागाच्या माध्यमातून राज्य भरातील विविध कामांसाठी ५१ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रस्त्यांबरोबरच इमारती, विमानतळ, बंदरे विकसित केली जाणार आहेत. ठेकेदाराला केलेल्या कामाचा मोबदला वेळेत दिला जात नसल्याने कामे लांबतात, हा अनुभव आहे. म्हणूनच गतिमान सरकारच्या काळात गतिमान पद्धतीने काम करत केलेल्यांना कामाचा मोबदलासुद्धा गतिमान पद्धतीने दिला जावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
याच गतिमन पद्धतीने विकासाचा बॅकलॉग भरला जाईल, याची खात्री मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागात तंत्रज्ञानाचा वापर करून एका क्लिकवर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पोर्टल सुरू करणार आहे.
त्यामुळे राज्यभरातील बांधकाम विभागाच्या कामांची माहिती एका क्लिकवर दिसणार असल्याचे सांगितले. अन्न नागरी पुरवठा विभागाचा मंत्री या नात्याने तंत्रज्ञानाचा वापर करत विविध योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवणार असल्याचा मानस आहे असेही रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले आहे.