मुंबई- मुंबईतील नागरिकांनी आता सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना किंवा इतर प्राण्यांना खाऊ घालण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागणार आहे.
मुंबई महापालिकेने (BMC) नव्या नियमावलीनुसार सार्वजनिक ठिकाणी कबुतर, कुत्री, मांजरी किंवा गायी यांना अन्न टाकणाऱ्या नागरिकांवर ५०० रुपयांपर्यंत दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.

घनकचरा व्यवस्थापनाच्या नव्या सुधारित नियमावलीत ही तरतूद कायम ठेवण्यात आली असून, याची कठोर अंमलबजावणी करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
दादरमधील प्रसिद्ध कबुतरखाना हटवण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. अनेक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकून अनधिकृत कबुतरखाने वाढत असल्याबाबत नागरिक सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत.
तसेच मांजरी आणि श्वानांना रस्त्यावर खाऊ घालण्यावरूनही अनेकदा वाद निर्माण होत असतात. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेने नव्या नियमावलीत या प्रकारावर दंडात्मक कारवाईची तरतूद ठेवली आहे.
मुंबईतील वाढत्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेने महापालिका आणि पोलीस विभागाकडे कबुतरखाने हटवण्याची मागणी केली आहे.
त्याच वेळी, महापालिकेने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याने ही तरतूद अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
आतापर्यंत या नियमाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नव्हती. मात्र आता महापालिकेच्या घनकचरा विभागाने रस्त्यावर कचरा करणाऱ्यांवर कारवाईसाठी उपद्रवशोधकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडे या पदांसाठी रिक्त जागा असून, लवकरच नवीन नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
मुंबईतील कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यामुळे श्वसनाचे आजार देखील वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक सामाजिक संघटनांनी गेल्या काही वर्षांपासून याबाबत जनजागृती केली असली तरी हा विषय वारंवार मागे पडतो. मात्र, मनसेच्या पर्यावरण विभागाने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
मनसेच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सांगितले की, मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत कबुतरखाने उभे राहत आहेत. विशेषतः समुद्र किनाऱ्यांवर कबुतरांसाठी धान्य विकणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
हे धान्य विकत घेऊन तिथेच टाकले जात असल्याने कबुतरांची संख्या अनियंत्रितपणे वाढत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी इमारतींमध्ये कबुतरे घर करतात आणि त्यांच्या विष्ठेतून व पिसांमधून श्वसनाचे आजार पसरतात. त्यामुळे हे अनधिकृत कबुतरखाने बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या पर्यावरण संघटनेने नुकताच ‘कबुतरखाना: शहरी भागातील कबुतरांचा धोका’ हा माहितीपट प्रदर्शित केला आहे. यामध्ये कबुतरांच्या अनियंत्रित संख्येमुळे भविष्यात मानवाला श्वसनाचे गंभीर आजार जडू शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्याने त्यांच्या संख्येत अनावश्यक वाढ होत असून, त्यामुळे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचा इशारा बीएनएचएसने दिला आहे.
मुंबई महापालिकेने या नव्या नियमावलीनुसार कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकल्यास त्वरित ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. यासाठी महापालिकेचे विशेष पथक तैनात केले जाणार असून, नागरिकांनी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या नव्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.