मुंबई- मुंबईतील वरळी-शिवडी उन्नत मार्गिका प्रकल्पासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्याची तयारी सुरू आहे. या कामामुळे 15 एप्रिलनंतर दादर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हा पूल बंद झाल्यास सायन, माटुंगा येथून येणारी आणि वरळी, लोअर परेल, महालक्ष्मीकडे जाणारी वाहतूक दादरच्या टिळक पुलावर वळवली जाणार आहे, ज्यामुळे दादर पश्चिमेला तीव्र वाहतूक अडथळे निर्माण होऊ शकतात. या बदलांमुळे स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

१५ एप्रिलनंतर पुल पाडणार
वरळी-शिवडी उन्नत मार्गिका हा प्रकल्प अटल सेतूला वांद्रे-वरळी सी-लिंकशी जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिसांनी या कामासाठी 15 एप्रिलनंतर पूल बंद करण्यास परवानगी देण्याची शक्यता आहे.
मात्र, पूल बंद झाल्याने दादर परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी होईल, विशेषतः प्लाझा ते कबुतरखाना दरम्यान वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. या कोंडीचा परिणाम टाळण्यासाठी रस्त्यावरील फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना हटवणे आवश्यक आहे, जेणेकरून रस्ते आणि पदपथ मोकळे राहतील. यामुळे वाहतुकीचा वेग काही प्रमाणात कायम राहू शकेल, असे स्थानिकांचे मत आहे.
उपाययोजना करणे गरजेचे
दादर व्यापारी संघाचे सुनील शहा यांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पुढील दीड वर्षांसाठी वाहतूक पोलिस, महापालिका आणि स्थानिक पोलिसांचे संयुक्त पथक प्रत्येक चौकात तैनात ठेवण्याची मागणी केली आहे.
तसेच, वाहतूक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पूल बंद करण्याचे परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला. वाहतूक तज्ज्ञ ए. व्ही. शेनॉय यांनीही स्थानिक पातळीवर समिती नेमून तिच्या सूचनांनुसार उपाययोजना राबवण्याचे सुचवले आहे. त्यांच्या मते, पूल बंद करण्यापूर्वी सर्व पर्यायांचा विचार करणे आणि नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा दादरमधील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडू शकते.
वाहतूक कोंडी होणार
लोअर परेल आणि ना. म. जोशी मार्गावरील रहिवाशांनी सांगितले की, प्रभादेवी पूल बंद झाल्यास वाहतुकीसाठी टिळक पूल आणि करी रोड पूल हे दोनच पर्याय उपलब्ध असतील. या दोन्ही पुलांवर प्रभादेवीच्या वाहतुकीचा अतिरिक्त भार पडेल, ज्यामुळे वाहतूककोंडी आणखी तीव्र होईल. सध्या 30 मिनिटांत होणारा प्रवास यामुळे लांबण्याची शक्यता आहे.
विशेषतः दादरला याचा सर्वाधिक फटका बसेल, कारण लोअर परेलमधील एसटी डेपोहून येणाऱ्या बसेसना एल्फिन्स्टन पुलाऐवजी वळसा घालून दादरला यावे लागेल. वाहतुकीचे नवे मार्गही जाहीर करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, दादर पश्चिमेकडे जाणारी वाहने मडके बुवा चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे खोदादाद सर्कल येथे टिळक पुलावरून पुढे जातील, तर सायनकडून वरळीकडे जाणारी वाहनेही टिळक पुलाचा वापर करतील.
पूल न पाडण्याची मागणी
प्रभादेवी पूल बंद झाल्याने केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागेल. उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी याबाबत महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी प्रभादेवी रेल्वे स्थानकावर पश्चिमेकडून पूर्वेकडे नवीन पादचारी पूल बांधेपर्यंत जुना पूल पाडू नये, अशी मागणी केली आहे.
पूल बंद झाल्यास दादरच्या टिळक पुलाचा किंवा करी रोड पुलाचा वापर करावा लागेल, ज्यामुळे केईएम, वाडिया आणि टाटा रुग्णालयांना जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठी अडचण होईल. याशिवाय, या परिसरातील नोकरदार, शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी यांचेही हाल होतील. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.