Mumbai Water Crisis |मुंबईकरांसाठी पाण्याचा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे. आधीच धरणांमधील पाणीसाठा 33% वर येऊन ठेपल्यामुळे पाणीटंचाई भासत असताना आता वॉटर टँकर सेवा देखील बंद होणार आहे.यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हं आहेत. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने जाहीर केले की 10 एप्रिलपासून वॉटर टँकर सेवा पूर्णतः बंद करण्यात येईल.
टँकर सेवा बंद होणार-
या निर्णयामागील कारण म्हणजे मुंबई महापालिकेकडून आलेली केंद्रीय भूजल प्राधिकरणाची नोटीस. यामध्ये विहीर आणि बोअरवेल मालकांना NOC (Non-Objection Certificate) घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. या आदेशामुळे अनेक बोअरवेल धारकांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. त्यांच्याकडे NOC नसल्याने वॉटर टँकरला पाणीपुरवठा करणे कायदेशीर दृष्टिकोनातून अडचणीचे ठरत आहे.

मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे अंकुर वर्मा म्हणाले की, “हजारो कुटुंबांना टँकरच्या माध्यमातून पाणी मिळतं. पण आता 70-80 वर्षांपासून चालणारा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.” टँकर मालकांना आलेल्या सीबीजीएच्या (CBGA) 381 ए नोटीसमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की बोअरवेल्स हटवाव्या लागतील आणि पाइपलाइन डिसमेंट करावी लागेल.
पाणीटंचाईने त्रस्त भाग-
कुलाबा, मुलुंड, घाटकोपर, कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, कुर्ला या भागांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात वॉटर टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. या टँकर सेवेवर मोठ्या प्रमाणात सोसायट्यांचा भर आहे, कारण महानगरपालिका पुरवठा अपुरा ठरत आहे.
धरणांचा पाणीसाठा-
ऊर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, मोडकसागर, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांमधील एकत्रित साठा फक्त 33.57 टक्क्यांवर आला आहे. मुंबई महापालिकेने आधीच राज्य सरकारकडे राखीव साठा वापरण्याची विनंती केली आहे. पावसाचे आगमन उशिरा झाल्यास मुंबईला पाणी कपात आणि कठोर निर्णयांना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरोग्यावर परिणाम-
पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाणारे काही टँकर प्रत्यक्षात बोअरवेलमधील अशुद्ध पाणी पुरवतात, अशीही तक्रार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
एकूण परिस्थिती पाहता, वॉटर टँकर सेवा बंद झाल्यास मुंबईसारख्या घनदाट लोकसंख्येच्या शहरात पाण्याची गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे शासन आणि पालिका प्रशासनाने त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता केली जात आहे.